मुंबई: राज्यातील भूकरमापकांना आता वाढीव वेतनश्रेणीसह पदोन्नती मिळणार आहे. भूकरमापक हे पद रद्द करण्यात आले असून परीरक्षण भूमापक पदाची निर्मिती करण्यात आली असून सुमारे ९ हजार भूकरमापकांना या पदावर बढती देण्यात येणार आहे. यासाठी १० हजार पदांच्या आकृतीबंधास मंजुरी देण्यात आली असून १०४५ पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय सचिव समितीने भूमि अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी दिली आहे. यामुळे विभागातील पदरचना आणि वेतनश्रेणीत मोठे बदल होणार आहेत. विभागाच्या नवीन आकृतीबंधानुसार एकूण १०,६८३ पदांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये ९,६३८ नियमित पदे असून १०४५ पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत. यामुळे विभागाच्या कामकाजास गती येणार असून जमिनीशी संबंधित प्रलंबित प्रकरणे मार्गी लागण्यास मदत होईल. भूकरमापक पदाचे शैक्षणिक स्वरूप आणि कामाची व्याप्ती लक्षात घेऊन त्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता भूकरमापकांना एस-६ ऐवजी एस-८ ही सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होणार आहे. या निर्णयानुसार ‘भूकरमापक’ हा संवर्ग आता ‘मृत संवर्ग’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. याचा अर्थ, भविष्यात या पदावर थेट भरती होणार नाही. त्याऐवजी ‘परिरक्षण भूमापक’ हे पद नियुक्तीचे प्रथम स्तर असेल. तसेच कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची संधी मिळावी यासाठी ‘परिरक्षण भूमापक (निवड श्रेणी)’ हा नवीन संवर्ग निर्माण करण्यात येणार आहे.

‘शिरस्तेदार’ म्हणून पदोन्नती मिळणे शक्य

परिरक्षण भूमापक हा आता नियुक्तीचा प्राथमिक स्तर असेल. यामुळे अनुभवी कर्मचाऱ्यांना परिरक्षण भूमापक (निवड श्रेणी) या संवर्गातून आता थेट ‘शिरस्तेदार’ संवर्गात पदोन्नती मिळणे शक्य होणार आहे. नवीन पदभरती आणि पदोन्नतीसाठी सेवा प्रवेश नियमांमध्ये सुधारणा करण्यात आल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.