पुणे : राज्यातील शाळांची नियतकालिक मूल्यांकन चाचणीदरम्यान पटपडताळणी करण्यात येणार आहे. त्यानुसार ११ एप्रिल, १५ एप्रिल आणि २२ एप्रिल या दिवशी शिक्षण विभागाचे पथक शाळांना भेट देऊन विद्यार्थी उपस्थितीचा आढावा घेऊन त्याची प्रणालीमध्ये नोंद करणार आहे. पटपडताळणीची प्रक्रिया एकाच वेळी पूर्ण करण्यासाठी नववी आणि अकरावीच्या परीक्षाही याच दिवशी आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी या बाबत परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे राज्यातील शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खासगी अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणी घेतली जाणार आहे. त्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार दुसरी ते आठवी या इयत्तांची ११ एप्रिल, १५ एप्रिल आणि २२ एप्रिल रोजी अनुक्रमे प्रथम भाषा, गणित आणि तृतीय भाषा या विषयाची परीक्षा घेतली जाणार आहे. याच काळात आता शाळांमध्ये पटपडताळणी प्रक्रियाही राबवली जाणार आहे.

या पार्श्वभूमीवर परिपत्रकाद्वारे दिलेल्या सूचनांनुसार, इयत्ता दुसरी ते आठवीच्या वर्गाची पटपडताळणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने आयोजित केलेल्या पॅट परीक्षेच्या दिवशी म्हणजेच ११ एप्रिल, १५ एप्रिल, २२ एप्रिल रोजी करावी. इयत्ता नववीची मराठी, गणित आणि इंग्रजी या विषयांची वार्षिक परीक्षा ११ एप्रिल, १५ एप्रिल, २२ एप्रिल रोजी आयोजित करावी. इयत्ता अकरावीची मराठी, भौतिकशास्त्र, इंग्रजी या विषयांची वार्षिक परीक्षाही याच दिवशी आयोजित करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यातील शाळा पटपडताळणीच्या अनुषंगाने ‘स्टुडंट पोर्टल’वर मुख्याध्यापक लॉगिन, केंद्रप्रमुख लॉगिन, विस्तार अधिकारी लॉगिन, शिक्षणाधिकारी लॉगिनवर सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. पटपडताळणीसाठी शाळेला भेट देणारे पथक या लॉगिनचा वापर करून उपस्थित आणि अनुपस्थित विद्यार्थ्यांची नोंद करतील.

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती ग्राह्य

इयत्ता दहावी, इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची पटपडताळणी करण्याची आवश्यकता नाही. राज्य मंडळाच्या परीक्षेतील विद्यार्थी उपस्थिती ग्राह्य धरली जाणार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.