महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२१ पुढे ढकलण्यात आली आहे. या परीक्षेसाठी पूर्व नियोजित उमेदवारांपेक्षा जास्त उमेदवारांना प्रवेश द्यावा लागणार असल्याने आयोगाने छपाई केलेल्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिकांच्या आधारे परीक्षा आयोजित करणे शक्य नसल्याने २९ जानेवारी, ५ फेब्रुवारी आणि १२ फेब्रुवारीला होणारी परीक्षा पुढील निर्णयापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. या संदर्भात अंतिम न्यायनिर्णय येईपर्यंत परीक्षेच्या आयोजनासंदर्भातील सर्व प्रक्रिया स्थगित करण्यात येत असल्याचेही आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
आयोगाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पत्रक शेअर केलं आहे. या पत्रकात आयोगाने म्हटलं आहे की, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० च्या दिनांक २५ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या उत्तरतालिकेसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या रिट याचिकेप्रकरणी उच्च न्यायालयाने २४ जानेवारी २०२२ रोजी दिलेल्या आदेशानुसार, याचिकाकर्त्या ८६ उमेदवारांना दिनांक २९, ३० जानेवारी २०२२ रोजी आयोजित परीक्षेसाठी निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात प्रवेश देऊन नियोजित दिनांकास परीक्षेचे आयोजन करण्याच्या अनुषंगाने आयोगाकडून या ८६ उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था तातडीने करण्यात आली होती.




“कोणत्याही परीक्षेकरता प्रवेश देण्यात आलेल्या उमेदवारांच्या संख्येच्या मर्यादेत आयोगाच्या कार्यालयाकडून उत्तरपत्रिका आणि प्रश्नपुस्तिकांची छपाई करण्यात येते. यामध्ये ऐनवेळी कोणत्याही कारणामुळे प्रवेश द्यायच्या उमेदवारांच्या संख्येत अल्प प्रमाणात होणारी संभाव्य वाढ विचारात घेतली जाते. या परीक्षेच्या अनुषंगाने राज्यातल्या विविध न्यायालयांनी दिलेल्या आदेशामुळे उमेदवारांच्या पूर्वनिश्चित संख्येपेक्षा खूप जास्त उमेदवारांना प्रवेश द्यावा लागणार आहे. त्यामुळे आयोगाकडून छपाई करण्यात आलेल्या प्रश्नपुस्तिका व उत्तरपत्रिकांच्या आधारे परीक्षा आयोजित करणं, परीक्षेच्या आयोजनासंदर्भातल्या इतरही बाबींची व्यवस्था करणं अल्पावधीत शक्य होणार नाही. त्यामुळे २९ जानेवारी, ३० जानेवारी, ५ फेब्रुवारी आणि १२ फेब्रुवारी २०२२ रोजी आयोजित विषयांकित परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे”, असं आयोगाने आपल्या पत्रकात नमूद केलं आहे.