Voter List Name Missing Maharashtra SIR Draft Form 6 Process: केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे महाराष्ट्रातील विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत प्रारूप (मसुदा) मतदार यादी जाहीर करण्यात आली असून, तब्बल २.०७ कोटी मतदारांची नावे या मसुद्यात नसल्याचे समोर आले आहे. मात्र प्राथमिक मसुद्यातून नाव वगळले गेले म्हणजे मतदानाचा हक्क कायमचा हिरावला गेला, असा याचा अर्थ होत नाही. नाव वगळण्यामागचे कारण तपासून पात्र मतदारांना ३० सप्टेंबरपर्यंत आपल्या हरकती आणि दावे नोंदवण्याची संधी निवडणूक आयोगाने दिली आहे.
नाव वगळले गेले असल्यास नेमके काय करावे? कोणती कागदपत्रे सादर करावी लागतील आणि अर्ज कसा करावा? याचा हा सविस्तर आढावा…
१. मसुदा यादीत आपले नाव कसे तपासावे?
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ‘व्होटर सर्व्हिस पोर्टल’वर, महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या पोर्टलवर जाऊन आपले नाव आधी शोधावे. यासाठी आपला मतदार ओळखपत्र क्रमांक वापरू शकता.
मुख्य यादीत नाव न आढळल्यास आयोगाने जाहीर केलेली ‘ASDD’ यादी तपासावी. पडताळणीदरम्यान घरी न आढळलेले, कायमस्वरूपी स्थलांतरित, मृत, अन्य ठिकाणी नोंदणीकृत/दुबार किंवा इतर कारणांमुळे ज्यांचे अर्ज गोळा होऊ शकले नाहीत, अशांची वर्गवारी या यादीत करण्यात आली आहे.
ही यादी जिल्हा निवडणूक संकेतस्थळांवर तसेच स्थानिक निवडणूक कार्यालयांमधील सूचना फलकांवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
२. नाव समाविष्ट करण्यासाठी काय करावे?
जर तुमचे नाव यादीत नसेल आणि तुम्ही मतदानासाठी पात्र असाल, तर तातडीने ‘नमुना ६’ (Form 6) भरून आवश्यक स्वयंघोषणापत्र व पुराव्यांची कागदपत्रे जोडून अर्ज दाखल करावा.
अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत: ३० सप्टेंबर २०२६
हरकती आणि दावे नोंदवण्यासाठी ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांनाही याच कालावधीत नोंदणी करता येईल.
३. अर्ज कुठे आणि कसा करावा?
ऑनलाइन पद्धत: मतदार निवडणूक आयोगाच्या ‘ECINET’ प्रणालीद्वारे किंवा व्होटर सर्व्हिस पोर्टलवरून घरबसल्या ऑनलाइन ‘नमुना ६’ सादर करू शकता.
ऑफलाइन पद्धत: विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे किंवा नियुक्त अधिकाऱ्यांकडे प्रत्यक्ष भेट देऊन अर्ज देता येईल.
आपल्या भागातील क्षेत्रीय केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी (BLO) संपर्क साधून योग्य अधिकाऱ्यांची माहिती आणि मदत मिळवता येईल. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय विशेष मदत कक्ष सुरू केले आहेत.
योग्य अर्जाचा वापर करा
नमुना ६ (Form 6): मतदार यादीत नवीन नाव नोंदवण्यासाठी किंवा गहाळ झालेले नाव पुन्हा समाविष्ट करण्यासाठी.
नमुना ७ (Form 7): मतदार यादीतील अपात्र नावावर आक्षेप घेण्यासाठी किंवा नाव वगळण्याची विनंती करण्यासाठी.
नमुना ८ (Form 8): नाव, वय, लिंग, पत्ता किंवा इतर तपशिलांमधील दुरुस्तीसाठी.
गैरहजर किंवा स्थलांतरित शेरा असल्यास काय करायचे?
घरोघरी भेट दिल्यानंतर उपस्थित न राहिल्याने ‘गैरहजर’ किंवा ‘स्थलांतरित’ अशी नोंद झाली असल्यास नागरिक मतदानासाठी अपात्र ठरत नाहीत. विशेषतः शहरी भागात बीएलओ भेटीदरम्यान अनेक नोकरदार किंवा विद्यार्थी घरात उपलब्ध नसतात. कामानिमित्त, शिक्षणासाठी किंवा इतर कारणांमुळे तात्पुरते राज्याबाहेर वा विदेशात गेलेल्या पात्र मतदारांचे हक्क हिरावले जाणार नाहीत, असे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे अशा नागरिकांनी मसुदा तपासून ३० सप्टेंबरपूर्वी दावा सादर करावा.
दावा सादर केल्यानंतर पुढील प्रक्रिया काय?
नागरिकांनी दाखल केलेले दावे आणि हरकतींची छाननी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांमार्फत केली जाईल. आवश्यकतेनुसार नोटीस पाठवून प्रत्यक्ष सुनावणी किंवा पडताळणी घेतली जाईल. ही सर्व प्रक्रिया २९ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण केली जाणार असून, नोटीस आल्यास संबंधित सुनावणीस उपस्थित राहणे आवश्यक आहे.
अंतिम मतदार यादी कधी?
प्राप्त दावे आणि हरकतींची पडताळणी २९ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण झाल्यानंतर ४ नोव्हेंबर २०२६ रोजी महाराष्ट्राची अंतिम अधिकृत मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.
