मुंबई : राज्यातील समाजकार्य महाविद्यालयांतील शिक्षक, शिक्षकेत्तर संवर्गाचा अंतिम आकृतिबंध तयार करून रिक्त पदाची भरती करण्याचा प्रस्ताव वित्त विभागाला पाठविला जाईल. वित्त विभागाची परवानगी आल्यानंतर तातडीने पदभरती केली जाईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिली. किरण सरनाईक, विक्रम काळे, मनिषा कायंदे आदींनी या बाबतचा प्रश्न उपस्थित केली होती.
राज्यात एकूण ६९ समाजकार्य महाविद्यालये असून, त्यापैकी ४९ अनुदानित, एक अशंतः अनुदानित तर १९ महाविद्यालये विनाअनुदानित तत्वावर सुरू आहेत. सध्या अनुदानित व अशंतः अनुदानित समाजकार्य महाविद्यालयांमध्ये शिक्षक संवर्गाची अनुदेय पदे ८२१ व शिक्षकेत्तर ८८१ अशी एकूण १७०२ पदे अनुदेय आहेत. त्यापैकी शिक्षकीय ५०८ आणि शिक्षकेत्तर ५८५, अशी एकूण १०९३ पदे कार्यरत आहेत. शिक्षकीय ३१३ व शिक्षकेत्तर २९६, अशी एकूण ६०९ पदे रिक्त आहेत. फेब्रुवारी २०२४ मध्ये समाजकार्य महाविद्यालये सामाजिक न्याय व विशेष न्याय विभागाकडून उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आली आहेत. आकृतिबंध अंतिम करण्याचा प्रयत्न सुरू आहे, आकृतिबंध अंतिम होताच. रिक्त पदाच्या भरतीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविला जाईल. वित्त विभागाची माहिती मिळताच तातडीने पदभरती केली जाईल, अशी माहिती पाटील यांनी दिली.
महाविद्यालयांतील शिक्षकेत्तर पदे भरणार
दरम्यान, महाविद्यालयांमधील शिक्षकेत्तर पदे भरण्याचा निर्णय झाला आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे २९०० पदाची परवानगी मागणार आहोत. परवानगी मिळताच लिपिक, शिपाई आदी पदांची भरती केली जाईल. उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून पाठपुरावा सुरू आहे, असेही पाटील म्हणाले.
