मुंबई : मृदा व जलसंधारण विभागाच्या फेररचनेसह विभागाकरिता सुमारे ८ हजार ७६७ पदांच्या आकृतीबंधास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. २०१७ मध्ये ग्रामविकास व जलसंधारण विभागातून मृदा व जलसंधारण या स्वतंत्र विभागाची निर्मिती करण्यात आली होती.

नव्याने विभाग निर्माण करताना छत्रपती संभाजी नगर येथे आयुक्तालयाच्या स्थापनेसह क्षेत्रीय स्तरावरील यंत्रणेसाठी सुमारे १६ हजार ४२३ पदाचा आकृतीबंध निश्चित करण्यात आला होता. यात मूळ विभागाची ६ हजार ४८१ पदे व कृषी विभागाकडून ९ हजार ९४२ पदे वर्ग होणे अपेक्षित होते. यावर उच्चस्तरीय सचिव समितीने मृदा व जलसंधारण विभागाकरिता मंजूर ६ हजार ४८१ व महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाकरिता मंजूर २ पदांसह एकूण ६ हजार ४८३ पदांव्यतिरिक्त सुमारे २ हजार २८४ वाढीव पदांसह ८ हजार ७६७ पदांचा सुधारित आकृतीबंधाला मान्यता दिली.

प्रादेशिक कार्यालयांतील १०२ पदे रद्द

या शिवाय विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेची फेररचना करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यात प्रादेशिक जलसंधारण अधिकारी सहा कार्यालयांतील १०२ पदे रद्द करण्यात येणार आहेत. सध्या जलसंधारण अधिकारी यांची ३१ कार्यालये असून, सुधारित आकृतीबंधात राज्यातील ३४ जिल्ह्यांसाठी ३४ कार्यालये स्थापन करण्यात येतील. वर्धा, पालघर व सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्ये नव्याने जिल्हा जलसंधारण अधिकारी यांची कार्यालये सुरु होतील.

महानगरपालिका क्षेत्रासाठी  ३१ पदे 

महानगरपालिका क्षेत्रामध्ये मृदा व जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात करावी लागतात. यासाठी मुंबई महानगर प्रदेशातील नऊ मनपांसाठी तीन पथके (९ पदे), पुणे व पिंपरी – चिंचवड २ मनपासाठी १ पथक (३ पदे), नाशिक व मालेगाव मनपासाठी १ पथक (३ पदे), उर्वरित १६ महानगरपालिकांमध्ये वरिष्ठ अभियंता किंवा सहायक अभियंता श्रेणी (प्रत्येकी १ पद) अशी १६ पदे, अशी एकूण २९ महापालिकांसाठी ३१ पदे नव्याने समाविष्ट करण्यात आली आहेत.

राज्यात सध्या १,५४३ मेगा वॉटरशेड

मृदा व जलसंधारण विभागांतर्गत जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे यंत्रणेम्ये जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांची ३० कार्यालये आहेत, त्यांची संख्या चारने वाढविण्यात येणार असून, कोल्हापूर, लातूर, रत्नागिरी व रायगड या चार जिल्ह्यांमध्ये नव्याने कार्यकारी अभियंता (जि.प. लघु पाटबंधारे) कार्यालये स्थापन करण्यात येणार असून, त्यासाठी ४०८ पदांना मान्यता देण्यात आली आहे. उप अभियंता यांची सध्या १४२ उप विभागीय कार्यालये आहेत. नव्याने ३३ कार्यालये सुरु करण्यात येणार आहेत.

प्रत्येक उफविभागांतर्गत ८ पथके निर्माण करण्यात येतील. यानुसार १७५ उप विभागांसाठी ८ पथके, अशी एकूण १,४०० पथके निर्माण करण्यात येतील. राज्यात सध्या १,५४३ मेगा वॉटरशेड असून, त्यांची विभागणी ५७, ८४२ मायक्रो वॉटरशेडमध्ये करण्यात आली आहे. यामध्ये एका मायक्रो वॉटरशेडमध्ये आठशे ते नऊशे हेक्टरचा समावेश असतो. त्यामुळे सरासरी ४० मायक्रो वॉटरशेडसाठी १ पथक काम करेल. महाराष्ट्र जलसंधारण महामंडळासाठी मंजूर दोन पदांव्यतिरिक्त वाढीव १९ पदांना अशा एकूण २१ पदांना मान्यता देण्यात आली आहे.

मंत्रालयातील अधिक्षक अभियंता तथा पदसिद्ध उपसचिव हे पद रद्द करून, त्याऐवजी उप अभियंता संवर्गातील ३ वाढीव पदे मंजूर करण्यात आली आहेत तसेच विभागाकरिता प्रतिनियुक्तीने विधी अधिकारी यांचे एक व वाहन चालकाचे एक पद, अशा १२ पदांचा समावेश करण्यात आला आहे.