रत्नागिरी : कोकण विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्थापनेपासून कायम राखलेला राज्यातील अव्वल निकालाचा मान यंदाही अबाधित ठेवला आहे. फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या दहावी परीक्षेत कोकण मंडळाचा एकूण निकाल ९७.६२ टक्के लागला.

गतवर्षी मार्च २०२५ मध्ये हा निकाल ९८.८२ टक्के होता. त्यामुळे यंदा निकालात १.२० टक्क्यांनी घट झाली असली, तरी राज्यात कोकण मंडळाने पुन्हा प्रथम क्रमांक पटकावला आहे.
कोकण विभागातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील ६४० माध्यमिक विद्यालयांमधून ११४ परीक्षा केंद्रांवर एकूण २५ हजार २२६ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २५ हजार १७२ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले. यांपैकी २४ हजार ५७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल ९७.६२ टक्के इतका लागला.

सिंधुदुर्गचा निकाल पुन्हा सरस

रत्नागिरी जिल्ह्यातील ४१२ माध्यमिक विद्यालयांतील १७ हजार ६१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १७ हजार २१ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यातील १६ हजार ५७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याचा निकाल ९७.३७ टक्के लागला. गतवर्षीच्या ९८.५८ टक्क्यांच्या तुलनेत यंदा १.२ टक्क्यांनी घट झाली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २२८ विद्यालयांमधून ८ हजार १६५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८ हजार १५१ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले. त्यांपैकी ७ हजार ९९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याचा निकाल ९८.१३ टक्के लागला. गतवर्षी हा निकाल ९९.३२ टक्के होता.

मुलींची बाजी कायम

कोकण मंडळातील मुलींनी यंदाही निकालात बाजी मारली. १२ हजार २४७ प्रविष्ट मुलींपैकी १२ हजार ७० मुली उत्तीर्ण झाल्या असून त्यांचा निकाल ९८.५५ टक्के लागला. तर १२ हजार ९२५ प्रविष्ट मुलांपैकी १२ हजार ५०३ मुले उत्तीर्ण झाली असून त्यांचा निकाल ९६.७३ टक्के आहे. मुलींचा निकाल मुलांपेक्षा १.८२ टक्क्यांनी अधिक आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात मुलांचा निकाल ९६.५० टक्के, तर मुलींचा ९८.२८ टक्के लागला. सिंधुदुर्गमध्ये मुलांचा निकाल ९७.२० टक्के, तर मुलींचा निकाल ९९.११ टक्के इतका नोंदविण्यात आला.

सर्व परीक्षा केंद्रांवर ‘सीसीटीव्ही’; कॉपीमुक्त अभियान यशस्वी

फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेपासून सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा अनिवार्य करण्यात आली होती. कोकण मंडळांतर्गत सर्व ११४ परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आल्याने कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यात आल्याचा दावा मंडळाने केला आहे.
यंदाच्या परीक्षाकालावधीत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत एकही गैरमार्ग प्रकरण नोंदविले गेले नाही. मात्र परीक्षोत्तर चौकशीत चार गैरप्रकार निदर्शनास आले. त्यापैकी दोन विद्यार्थी दोषी आढळल्याने संबंधित विषयांची संपादणूक रद्द करण्यात आली.

पुनर्परीक्षार्थ्यांचा निकाल ३९.०३ टक्के

पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल ४०.६० टक्के, तर सिंधुदुर्गचा निकाल ३५.१८ टक्के लागला. दोन्ही जिल्ह्यांचा मिळून पुनर्परीक्षार्थ्यांचा एकूण निकाल ३९.०३ टक्के इतका नोंदविण्यात आला.

खाजगी विद्यार्थ्यांचा निकाल ७९.५७ टक्के

खाजगी विद्यार्थ्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात २०२ विद्यार्थ्यांपैकी १५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ७६.७३ टक्के लागला. सिंधुदुर्गमध्ये ८२ विद्यार्थ्यांपैकी ७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ८६.५८ टक्के नोंदविण्यात आला. एकूण २८४ प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी २२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून खाजगी विद्यार्थ्यांचा निकाल ७९.५७ टक्के लागला.