मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या सरकारच्या ‘लालपरी’ अर्थात एसटीवर आता सात हजार सीसी टिव्ही कॅमेरे २४ तास नजर ठेवणार आहेत. राज्यातील ६३३ बस स्थानकांपासून ते विभागीय कार्यालयापर्यंत हे सीसी टिव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. यासाठी १११ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
एसटी महामंडळाने एक महत्त्वाकांक्षी ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्प’ हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून एसटीच्या बसस्थानकांपासून ते विभागीय कार्यालयांपर्यंत सर्वच महत्त्वाच्या ठिकाणांवर डिजिटल नजरेचे अभेद्य जाळे उभारले जाणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत शासनाने या प्रकल्पासाठी १११ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीच्या सहाय्याने एसटीच्या बसस्थानके, आगार, विभागीय कार्यशाळा, मध्यवर्ती कार्यशाळा, विभागीय कार्यालये तसेच मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था भोसरी यांसारख्या संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. एकूण ६३३ ठिकाणी ७०३५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, यामुळे एसटीच्या प्रत्येक हालचालीवर सतत डिजिटल नजर राहणार आहे.
या अत्याधुनिक प्रकल्पाची जबाबदारी ई-निविदा प्रक्रियेद्वारे निवडलेल्या टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंट इंडिया लिमिटेड या संस्थेकडे सोपविण्यात आली आहे. यासाठी या प्रकल्पाचा एकूण कालावधी १ वर्ष निश्चित करण्यात आला आहे.
या प्रकल्पाचा मुख्य कणा ठरणारे मध्यवर्ती नियंत्रण कक्ष मुंबई येथे उभारण्यात आले आहे. त्याची वापरकर्ता स्वीकृती चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. या नियंत्रण कक्षातून राज्यभरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे पद्धतीने लक्ष ठेवले जाणार आहे. त्यामुळे कोणतीही संशयास्पद हालचाल तात्काळ ओळखून आवश्यक ती कार्यवाही करता येणार आहे.
प्रकल्पाच्या पायलट टप्प्यात मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर विभागातील ६४ महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही प्रणाली यशस्वीरित्या बसविण्यात आली आहे. उर्वरित २७ विभाग, तसेच विविध कार्यशाळा आणि कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची पुढील कार्यवाही सुरू आहे.
‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्प’ हा केवळ कॅमेरे बसविण्याचा उपक्रम नसून, तो एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच देणारा आणि प्रवाशांच्या विश्वासाला नवे बळ देणारा एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे. असे सरनाईक यांनी सांगितले.

