scorecardresearch

‘आम्हाला एकनिष्ठ उमेदवार हवा,’ शिक्षक सेनेची भूमिका; सत्यजित तांबेंना नाशिकची पदवीधरची निवडणूक कठीण जाणार?

विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

‘आम्हाला एकनिष्ठ उमेदवार हवा,’ शिक्षक सेनेची भूमिका; सत्यजित तांबेंना नाशिकची पदवीधरची निवडणूक कठीण जाणार?
सत्यजित तांबे (इंडियन एक्स्प्रेस)

विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसच्या सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे सत्यजित तांबे यांचे मामा असलेले बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेस पक्ष चांगलाच अडचणीत सापडला आहे. दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आता सत्यजित तांबे वेगवेगळ्या संघटना तसेच पक्षांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. असे असतानाच महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला आहे. आम्हाला एकनिष्ठ उमेदवार हवा आहे. आमचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे आम्हाला आमची हक्काची व्यक्ती हवीय, अशी भूमिका महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे विभागीय अध्यक्ष संजय चव्हाण यांनी मांडली आहे.

हेही वाचा >>> सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवर अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले “बाळासाहेब थोरातांना आधीच…”

“नाशिक पदवीधर मतदारसंघ हा सुशिक्षितांचा मतदारसंघ आहे. मागील आठ दिवसांपासून ज्या घडामोडी घडत आहेत, त्या अतिशय दुर्दैवी आहेत. निष्ठा कोणाशीही ठेवायची नाही, आणि सगळीकडे तडजोड करायची हे आता उघड झालेले आहे. सत्यजित तांबे यांना भाजपाचा पाठिंबा आहे. याच कारणामुळे बंडखोरांसोबत जायचे नाही, असे आम्ही ठरवलेले आहे,” अशी माहिती संजय चव्हाण यांनी दिली.

हेही वाचा >>> पुणे शहराचे ‘जिजाऊ नगर’ नामांतर करावे का? अजित पवार यांनी मांडली भूमिका; म्हणाले “उगीचच…”

“महाराष्ट्रातील शिक्षकांच्या सर्वच संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, टीडीएफ, माध्यमिक शिक्षक संघ, मुख्याध्यापक संघ या सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक होणार आहे. सर्व विभागातील शिक्षक संघटना या बंडखोरीला विरोध करतील, यासाठी आम्ही धोरण ठरवत आहोत,” अशी माहिती शिक्षक सेनेचे विभागीय अध्यक्ष संजय चव्हाण यांनी दिली.

हेही वाचा >>> “फडणवीसांनी संकेत दिले होते, पण..,” शिक्षक, पदवीधरच्या निवडणुकीवर शिवसेनेचे महत्त्वाचे भाष्य

“नाशिक पदवीधर मतदारसंघ म्हणजे काही सातबारा नाही. कोणाच्या बापाच्या नावार पोरगा पुढे आला पाहिजे, असे नाही. आमचे प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत. शिक्षण क्षेत्रात प्रचंड प्रश्न निर्माण झाले आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला हक्काचा माणूस हवाय. तसेच तो निष्ठावान हवा,” असे मत शिक्षक सेनेचे विभागीय अध्यक्ष संजय चव्हाण यांनी व्यक्त केले.

हेही वाचा >>>अशोक चव्हाणांनी पंकजा मुंडेंना दिला मोलाचा सल्ला, नाराजीच्या चर्चेवर बोलताना म्हणाले “कोणत्या घोड्यावर…”

दरम्यान, सत्यजित तांबे भाजपा तसेच अन्य पक्षांना पाठिंबा देण्याची विनंती करणार आहेत. त्यासाठी ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे. तर सत्यजित तांबे यांनी आम्हाला पाठिंब्यासाठी विचारणा केल्यास आम्ही त्याचा विचार करू, अशी भूमिका भाजपाने घेतली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-01-2023 at 12:49 IST

संबंधित बातम्या