maharashtra state women commission notice to sambhaji bhide: आपल्या वादग्रस्त विधानांमुळे सतत चर्चेत असणारे शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराशी केवळ टिकली लावली नाही म्हणून बोलण्यास नकार दिल्याचा प्रकार बुधवारी मंत्रालयामध्ये घडला. या प्रकरणाची दखल थेट राज्य महिला आयोगाने घेतली आहे. टिकली लावली नाही तर प्रतिक्रिया देणार नाही या भुमिकेसंदर्भात स्पष्टीकरण भिडे यांनी तात्काळ द्यावं अशी नोटीसच पाठवली आहे. आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्वीटरवरुन हे पत्र शेअर केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुधवारी संभाजी भिडे यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर एका महिला पत्रकाराने त्यांच्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ‘आधी कुंकू लाव मगच तुझ्याशी बोलतो,’ असं म्हणत संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराला प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यामुळे भिडे यांनी महिला पत्रकाराचा अपमान केल्याची चर्चा सुरु झाली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराने संभाजी भिंडेंना प्रश्न विचारला, “तुम्ही आज मंत्रालयात कोणाची भेट घेतली?,” यावर “तू आधी कुंकू किंवा टिकली लाव, तरच तुझ्याशी बोलेन. प्रत्येक स्त्री ही भारत मातेचं रुप आहे. भारत माता विधवा नाही आहे,” असं वादग्रस्त वक्तव्य भिडे यांनी केलं.

या प्रकरणावरुन प्रतिक्रिया उमटत असतानाच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भिडे यांना टिकली लावल्यावरच प्रतिक्रिया देणार ही भूमिका तातडीने स्पष्ट करावी अशी नोटीस पाठवली आहे. चाकणकर यांच्या लेटरहेडवर भिडेंना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. संभाजी भिडे यांच्या सांगलीमधील पत्त्यावर ही नोटीस पाठवण्यात आली असून या नोटीसचा विषय ‘महिला पत्रकाराने कपाळावर टिकली लावली नाही म्हणून प्रतिक्रिया देण्यास नकार देण्यामागील भूमिकेचा खुलासा सादर करण्याबाबत’ असा असल्याचा उल्लेखही करण्यात आला आहे.

“महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम, १९९३ अंतर्गत कलम १० (१) (फ) (एक) व (२) नुसार महाराष्ट्र राज्य महिला आयोगास स्त्रियांच्या तक्रारी विचारार्थ स्विकारणे आणि त्या बाबींची स्वाधिकारी दखल घेणे याकरीता प्राधिकृत करण्यात आले आहे. महिला पत्रकाराने कपाळावर टिकली लावली नाही म्हणून आपण तिच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. स्त्रीचा दर्जा तिच्या कर्तुत्वाने सिद्ध होत असतो. आपले वक्तव्य स्त्री सन्मानाला आणि समाजिक दर्जाला ठेच पोहचविणारे आहे,” असं चाकणकर यांनी पत्रात म्हटलं आहे.

“आपल्या वक्तव्याबाबत समाजातील सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने त्याची दखल घेतली आहे. तरी कपाळावर टिकली नाही म्हणून महिला पत्रकाराशी बोलण्यास नकार देण्यामागील आपल्या भुमिकेचा खुलासा महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा, १९९३ कलम १२ (२) व १२ (३) नुसार तात्काळ सादर करावा,” असे निर्देश भिडेंना देण्यात आले आहेत.

“साम टीव्हीच्या महिला पत्रकाराला तू टिकली लावली नाही म्हणून तुझ्याशी बोलणार नाही असे सांगत त्या महिलेचा आणि पत्रकारितेचाही अपमान करणाऱ्या संभाजी भिडेंचा निषेध आहे. याआधी ही महिलांना हीन समजणारी, तुच्छतादर्शक वक्तव्य त्यांनी वारंवार केली आहेत त्यांची मनोवृत्ती यातून दिसून येते, त्यांना आत्मचिंतनाची गरज आहेच. टिकली ही महिलेच्या कर्तृत्वाचं मोजमाप नाही. त्यांनी केलेल्या वक्तव्याचा तातडीने खुलासा करावा,” अशा कॅप्शनसहीत रुपाली चाकणकर यांनी हे पत्र ट्वीटरवर शेअर केलं आहे.

दरम्यान, याच प्रकरणासंदर्भात बोलताना चाकणकर यांनी, “संभाजी भिडे यांनी यापूर्वीही ‘आंबे खाल्याने मुलं होतात’, असं वक्तव्य केलं होतं. एक महिला पत्रकार शिक्षण घेऊन तिथेपर्यंत पोहचली आहे. टिकलीवरून महिलेची पात्रता आणि पद ठरवणे चुकीचं आहे,” असं मत व्यक्त केलं.

“ही सामाजिक विकृती आहे. सातत्याने महिलांना दुय्यम लेखणाऱ्यांची विकृती नाहीशी करणे गरजेचे आहे. महिला आयोगाच्यावतीने याचा जाहीर निषेध व्यक्त करते,” असेही रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra state women commission notice to sambhaji bhide over his comment on lady reporter about bindi scsg
First published on: 03-11-2022 at 09:50 IST