Tragic Death of Neelam Shinde after 14 months in coma: महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील विद्यार्थिनी निलम शिंदे (वय ३५) उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेली होती. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी एका भरधाव वेगात आलेल्या वाहनाने तिला धडक दिली. तब्बल १४ महिने कोमामध्ये राहिल्यानंतर निलम शिंदेचा मृत्यू झाला आहे. शस्त्रक्रिया आणि दीर्घकाळ वैद्यकीय उपचार घेऊनही निलमला शुद्ध आली नाही.

साताऱ्यातील निलम शिंदेने जगाचा निरोप असतानाही अनेकांना प्रेरणा दिली आहे. निलम शिंदेंच्या अखेरच्या इच्छेप्रमाणे अवयव दान केले जाणार आहे, यामुळे अनेकांचे आयुष्य उजळणार आहे. मात्र निलमच्या कुटुंबियांसाठी हा मोठा धक्का आहे. मागच्या १४ महिन्यांपासून अनिश्चितता, भावनिक गुंतागुंत, वेदनादायी संघर्ष याचीही अखेर झाली आहे.

गंभीर दुखापत, व्हिसा, संघर्ष

वेगवान कारच्या धडकेमुळे निलमच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तसेच हात, पाय आणि छातीलाही जखमा झाल्या. डोक्याच्या दुखापतीवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांनी तात्काळ शस्त्रक्रिया केली. परंतु तरीही तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नाही. अनेक महिने अतिदक्षता विभागात उपचार केल्यानंतरही निलमच्या मज्जासंस्थेमध्ये लक्षणीय सुधारणा झाली नाही.

Neelam Shinde Death USA Update
संगणकशास्त्राचे शिक्षण घेण्यासाठी चार वर्षांपूर्वी निलम शिंदे अमेरिकेत गेली होती.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, उपचारांमधील गुंतागुंत आणि प्रकृती खालावल्यामुळे २८ मार्च रोजी डॉक्टरांनी जीवनरक्षक प्रणाली काढून घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर निलमच्या प्रकृतीत झपाट्याने बिघाड झाला आणि तिने प्राण सोडले.

कुटुंबाचा व्हिसा मिळवण्याचा संघर्ष

निलमच्या अपघातानंतर अमेरिकेत जाऊन तिला पाहण्यासाठी कुटुंबाला बराच संघर्ष करावा लागला. वडील तानाजी शिंदे आणि भावाला आपत्कालीन व्हिसा मिळवण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अखेर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणात लक्ष घालत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, अमेरिकेतील भारतीय दूतावास आणि परराष्ट्र खात्याला एक्सवरील पोस्टमध्ये टॅग करून मदतीची विनंती केली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारमधील अनेकांनी हस्तक्षेप केल्यानंतर तानाजी शिंदे आणि चुलत भावाला व्हिसा मंजूर झाला होता. व्हिसाच्या प्रदीर्घ प्रक्रियेमुळे सुरुवातीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर मौल्यवान वेळ वाया गेला.

शिंदे कुटुंबाचे दुर्दैव म्हणजे निलमच्या अपघातापूर्वीच तिच्या आईचेही निधन झाले होते. ज्यामुळे तानाजी शिंदे यांना एकाचवेळी दोन्ही संकटाचा सामना करावा लागला.

Neelam Shinde father
आधी पत्नी आणि नंतर मुलगी गमावली. वडील तानाजी शिंदे यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर.

निलम शिंदे गेल्या चार वर्षांपासून अमेरिकेत संगणकशास्त्राचे शिक्षण घेत होती. सातारा ते अमेरिका हा प्रवास सोपा नव्हता. उच्चशिक्षणाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचे, समाजाचे आणि आपल्या भागाचे नाव उंचावण्याचे एक मोठे स्वप्न उराशी बाळगून निलमने शैक्षणिक वाटचाल केली होती. पण वेगात बेभान होत वाहन चालविणाऱ्या आरोपीमुळे शिंदे कुटुंबाच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली.

८ एप्रिल रोजी अमेरिकेत भारतीय वेळेनुसार पहाटे १ वाजता निलमवर हिंदी चालीरितीनुसार अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.