मुंबई : नुकत्याच झालेल्या ‘आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धे’त भारताला १ सुवर्ण, १ रौप्य आणि ३ कांस्य पदके  मिळाली आहेत. आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्येही भारताला ३ रौप्य आणि १ कांस्य पदक मिळाले आहे. एप्रिल २०२१ मध्ये झालेल्या युरोपियन गर्ल्स मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाडमध्ये भारतीय विद्यार्थिनीने रौप्य पदक मिळवले आहे.

पुण्याचा १८ वर्षीय अनिष कुलकर्णी गेली ५ वर्षे गणित ऑलिम्पियाडची तयारी करत आहे. राष्ट्रीय स्पर्धेतील प्रथम ६ विजेते आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी जातात. यंदाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी अनीशला मिळाली. त्याने रौप्य पदक पटकावले.

पुण्याचीच १६ वर्षीय अनन्या रानडे हिने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड स्पर्धेत कांस्य पदक पटकावले तर ‘युरोपियन गर्ल्स मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड’ स्पर्धेत तिने रौप्य पदकाची कमाई के ली आहे. २०२१च्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये सुवर्ण पदक मिळवणारा बंगळूरुचा प्रांजल श्रीवास्तव याने २०१८ मध्ये रौप्य पदक व २०१९ मध्ये सुवर्ण पदक मिळवले होते. या स्पर्धेत आतापर्यंत २ सुवर्ण पदके  मिळवणारा प्रांजल हा पहिला भारतीय विद्यार्थी ठरला आहे. नवी दिल्लीचा रोहन गोयल, गाझियाबादचा सुचिर कौस्तव यांनी कांस्य पदके  मिळवली आहेत. डॉ. एस. मुरलीधरन, साहील म्हसकर, प्रा. एस. आर. कृष्णन, अनंत मुदगल यांनी भारतीय समूहाला मार्गदर्शन केले. अन्शुल सिवच, धिरेन भारद्वाज, नमन सिंग यांनी जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये रौप्य पदक मिळवले आहे तर स्वराज नंदी याने कांस्य पदक पटकावले आहे.

निवड प्रक्रिया

‘टाटा मूलभूत संशोधन केंद्रा’च्या ‘होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रा’तर्फे  आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडचे समन्वयन के ले जाते. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड दरवर्षी ४ स्तरांमधून के ली जाते. यंदा करोनास्थितीमध्ये २ स्तरांमधून निवड करण्यात आली. पहिल्या स्तरामध्ये ‘भारतीय ऑलिम्पियाड पात्रता फेरीपरीक्षा’ देशभरातील १७५ केंद्रांवर घेण्यात आली. यात १७ हजार ३५२ विद्यार्थी सहभागी झाले होते. दुसऱ्या स्तरामध्ये २५ केंद्रांवर घेण्यात आलेल्या परीक्षेत १,२६६ विद्यार्थी सहभागी झाले होते. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत १०७ देशांमधून ६१९ विद्यार्थी सहभागी झाले होते.