अलिबाग – आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी, तसेच नुतन वर्षाच्या सुरुवातीला नविन मालमत्ता खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. त्यामुळे दस्त नोंदणी वाढते, ही बाब लक्षात घेऊन सुट्टीच्या दिवशी दुय्यम निबंधक सुरु ठेवण्याचे आदेश नोंदणी महानिरीक्षकांनी सर्व जिल्ह्यातील मुद्रांक जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.

या आदेशांनुसार २६ मार्च, २८ मार्च, २९ मार्च आणि ३१ मार्च या दिवशी राज्यभरात दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालये सुरु ठेवली जाणार आहेत. या शिवाय सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयेही सुरू ठेवली जाणार आहेत. ज्या दुय्यम निंबधक कार्यालयांची साप्ताहीक सुट्टी ही शनीवार आणि रविवार वगळून असते. ती कार्यालये साप्ताहीक दोन सुट्ट्यांपैकी एक दिवस सुरु ठेवण्याचे निर्देश नोंदणी उपमहानिरीक्षकांनी दिले आहेत. मुंबई शहर आणि मूंबई उपनगर यांच्यासह सर्व जिल्ह्यांसाठी हे आदेश लागू असणार आहेत.

दरवर्षी मार्च महिन्याच्या उत्तरार्धात दस्त नोंदणी प्रमाण वाढत असते, आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी जागा जमिनीत गुंतवणूक करण्याकडे जनसामान्यांचा कल असतो हीबाब लक्षात घेऊन दस्त नोंदणीत सुट्ट्यांचा अडथळा येऊ नये यासाठी मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात दुय्यम निबंधक कार्यालये सुट्टीच्या कालावधीत सुरू ठेवली जाणार आहेत.

मुद्रांक वसुली सुरु रहावी आणि इष्टांक पूर्तता व्हावी हा देखील या निर्णयामागचा उद्देश आहे. दरम्यान नोंदणी उपमहानिरीक्षकांच्या निर्देशानुसार रायगड जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये २६,२८, २९ आणि ३१ मार्च रोजी सुरू राहणार असल्याची माहिती रायगडचे मुद्रांक जिल्हाधिकारी अमित शेडगे यांनी दिली.