मुंबई : साखर कारखानदारी आर्थिक अडचणीत असतानाही शेतकऱ्यांना देय असलेला उसाचा रास्त आणि किफायतशीर भाव (एफआरपी) देण्यात राज्यातील कारखाने अव्वल आहेत. एकूण देय एफआरपीच्या ९५.७२ टक्के एफआरपी शेतकऱ्यांना अदा केली आहे. एकूण देय एफआरपी ४०,३२७ कोटी रुपये इतकी होती, त्यापैकी ३९,१९७ कोटी रुपये दिले आहेत. तर २,१३० कोटी रुपये अद्याप थकीत आहेत.
यंदाच्या हंगामात २०९ कारखान्यांनी १०४२.२७ लाख टन उसाचे गाळप केले. त्यापोटी कारखान्यांकडून शेतकऱ्यांना ४०,३२७ कोटी रुपयांची एफआरपी देय होती. कारखान्यांकडून शेतकऱ्यांना ३८,१९७ कोटी रुपयांची एफआरपी अदा करण्यात आली आहे. हे प्रमाण एकूण एफआरपीच्या ९४.७२ टक्के इतके आहे.
१७७ कारखान्यांकडे २,१३० कोटी रुपये थकीत
राज्यातील २०९ पैकी ९२ कारखान्यांनी संपूर्ण एफआरपी अदा केली आहे. ८० ते ९९.९९ टक्के अदा करणारे कारखाने ८४ आहेत. ६०.०० ते ७९.९९ टक्के एफआरपी दिलेले कारखाने २३ आहेत. ००.०० ते ५९.९९ टक्के एफआरपी दिलेले कारखाने १० आहेत. एकूण १७७ कारखान्यांकडे एफआरपीची २,१३० कोटी रुपये रक्कम थकीत आहे. काही कारखान्यांनी देय एफआरपीपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांना अदा केली आहे.
कारखान्यांवर कर्जाचा बोजा वाढला
राज्यासह देशातील साखर कारखानदारी आर्थिक अडचणीत आहे. तरीही राज्यातील कारखान्यांनी बँकांकडून कर्ज काढून शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम दिली आहे. शेतकऱ्यांना पैसे मिळाले असले तरीही कारखान्यांवरील कर्जाचा बोजा आणि आर्थिक तूट वाढली आहे, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
