अहिल्यानगर: राज्य साखर कामगार महासंघ व राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ या दोन्ही संघटनांनी राज्यातील साखर व जोडधंद्यातील कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी दि. २२ ऑक्टोबरपासून बेमुदत संप पुकारण्याचा निर्णय घेतल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष पी. के. मुंडे व सरचिटणीस आनंद वायकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे कळवली आहे.
साखर उद्योगातील कामगारांच्या वेतनवाढीसंदर्भात राज्य शासनाने नियुक्त केलेल्या त्रिपक्ष समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने मालक आणि कामगार प्रतिनिधी यांच्यामध्ये झालेल्या कराराची मुदत ३१ मार्च २०२९ अखेर आहे. मात्र साखर उद्योगातील कामगारांच्या हक्कांशी संबंधित महाराष्ट्र औद्योगिक संबंध अधिनियम १९४६ (बीआयआर) कायदा शासनाने रद्द केला आहे. त्यामुळे साखर व जोडधंद्यात कार्यरत असलेल्या सुमारे दोन ते अडीच लाख कामगारांना न्याय्य हक्कांपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता असल्याने कामगारांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला असल्याचे संघटनांनी म्हटले आहे.
राज्यातील साखर कामगारांचे १ हजार कोटीऔपेक्षा अधिक थकीत वेतन असल्याचा दावा संघटनांनी केला आहे. त्याचबरोबर अनेक साखर कारखाने अनेक वर्षांपासून बंद अथवा आजारी आहेत. या कारखान्यांमधील रोजंदारी व कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांना कारखान्याच्या सेवेत सामावून घेऊन त्यांना वेतनश्रेणी लागू करावी, अशीही मागणी आहे.
या मागण्यांचे मसुदापत्र दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी मुख्यमंत्री, सहकार मंत्री, कामगार मंत्री, साखर कारखाना संघाचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक तसेच कामगार आयुक्तांना दिल्याचे संघटनांनी सांगितले. शासनाने बीआयआर कायदा रद्द करण्याचा अध्यादेश काढला. या निर्णयास दोन्ही मान्यताप्राप्त संघटनांनी विरोध नोंदविला आहे. परंतु मागण्यांची दखल घेतली नसल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.
यासह बंद व आजारी कारखाने सुरू करून तेथील कामगारांचे पुनर्वसन करण्यात यावे, साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करावी, शेतकरी कामगारांना कर्जमाफीचा लाभ द्यावा आदी मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यास महाराष्ट्रातील साखर व जोडधंद्यातील कामगार-कर्मचारी २२ ऑक्टोबर २०२६ रोजी पहिल्या पाळीपासून बेमुदत काम बंद करून संपावर जाणार आहेत. या संपामध्ये राज्यातील साखर व जोडधंद्यातील सर्व कामगार-कर्मचारी सहभागी होणार असल्याचे दोन्ही संघटनांनी नोटीशीद्वारे स्पष्ट केले आहे.
