मुंबई : यंदाच्या उसाच्या गळीत हंगामात फेब्रुवारी अखेरपर्यंत देशात सुमारे २४६ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. एकूण साखर उत्पादनात ९५ लाख टनासह महाराष्ट्र आघाडीवर आहे. त्या खालोखाल ७४.१० लाख टनांसह उत्तर प्रदेश दुसऱ्या आणि ४४.५ लाख टनांसह कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर आहे. देशाच्या एकूण साखर उत्पादनात या तीन राज्यांचा वाटा ७८ टक्के राहिला आहे.
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, नवी दिल्ली यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाचा साखर हंगाम साधारण नोव्हेंबर महिन्यापासून सुरू झाला. साखर हंगामात देशभरात एकूण ५३६ कारखान्यांनी उसाचे गाळप केले. आजवर एकूण २६०८.९६ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. त्यातून २४६ लाख टन साखर उत्पादन झाले आहे.
साखर उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर असून, १००७.४१ लाख टन ऊसाचे गाळप करून ९५.२० लाख टन साखर उत्पादन झाले आहे. सरासरी ९.३५ टक्के साखर उतारा मिळाला. आजवर महाराष्ट्रातील १३० कारखान्यांनी गाळप पूर्ण केले आहे. त्या खरोखर उत्तर प्रदेशचा नंबर लागतो उत्तर प्रदेश मध्ये ७३७.३१ लाख टन ऊस गाळप करण्यात आले असून, त्यातून ७४.१० लाख टन साखर उत्पादन झाले आहे. सरासरी ९.४५ टक्के मिळाला. उत्तर प्रदेशातील १८ कारखान्यांनी गाळप पूर्ण केले आहे. कर्नाटकमध्ये ५१५.२० लाख टन ऊस गाळप होऊन ४४.०५ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा ८.५० टक्के साखर उतारा मिळाला. ६० कारखान्यांनी गाळप पूर्ण केले आहे.
देशात अद्यापही सुरू झालेल्या ५३६ पैकी २८८ साखर कारखान्यांचे गाळप सुरू आहे. हंगामाच्या अखेरपर्यंत सुमारे ३२० लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे, त्यातील ४०-४५ लाख टन साखरेचा इथेनॉल निर्मितीसाठी उपयोग केला जाईल. निव्वळ साखर उत्पादन २९० लाख टन होण्याचा अंदाज आहे.
