पुणे : देशात साखर उत्पादनात उत्तर प्रदेशला मागे टाकून महाराष्ट्र चालू हंगामात पहिला क्रमांक पटकावणार आहे. या हंगामात देशातील एकूण साखर उत्पादन ३२४ लाख टन असेल आणि त्यात महाराष्ट्राचा वाटा ११८ लाख टन तर उत्तर प्रदेशचा वाटा ९८.५ लाख टन असेल, असा अंदाज इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (इस्मा) बुधवारी वर्तविला.
‘इस्मा’च्या कार्यकारी समितीची बैठक पुण्यात झाली. या बैठकीनंतर देशातील साखर उत्पादनाचा चालू हंगामातील तिसरा सुधारित अंदाज जाहीर करण्यात आला. या महिन्याच्या सुरुवातीला उपग्रहांद्वारे घेतलेल्या छायाचित्रांचे मूल्यमापन करून हा अंदाज मांडण्यात आला आहे. त्यात आतापर्यंत तोडणी झालेल्या उसाचे क्षेत्र, तोडणी राहिलेले क्षेत्र यांचा विचार करण्यात आला आहे. तसेच, उसाचे उत्पादन, साखरेचा उतारा या गोष्टींचाही विचार यात करण्यात आला आहे.
‘इस्मा’च्या अंदाजानुसार, देशात या हंगामात साखर उत्पादन ३२४ लाख टन राहील. त्यातील ३१ लाख टन साखर इथेनॉल उत्पादनासाठी वळविण्यात येईल. यामुळे निव्वळ साखर उत्पादन २९३ लाख टन असेल. गेल्या वर्षीपेक्षा हे उत्पादन १२ टक्के जास्त असेल. आधीच्या अंदाजात देशात साखर उत्पादनात उत्तर प्रदेश आघाडीवर राहील, असे चित्र मांडण्यात आले होते. नवीन अंदाजात उत्तर प्रदेशला मागे टाकून महाराष्ट्र प्रथम स्थानी पोहोचला आहे. महाराष्ट्रातील एकूण साखर उत्पादन ११८ लाख टन असेल. गेल्या हंगामात ते ९३.५१ लाख टन होते. उत्तर प्रदेशचे साखर उत्पादन ९८.५ लाख टन अपेक्षित असून, ते गेल्या हंगामात १०१.१६ लाख टन होते. कर्नाटकचे साखर उत्पादन ६१.०४ लाख टन राहण्याचा अंदाज असून, ते गेल्या हंगामात ५४.८८ लाख टन होते.
अतिरिक्त साठा ५३ लाख टन
‘चालू हंगाम सुरू होताना ऑक्टोबर २०२५ मध्ये देशातील साखरेचा अतिरिक्त साठा ५० लाख टन होता. यंदाच्या हंगामात उत्पादन, इथेनॉल निर्मितीसाठी वळविण्यात येणारे उत्पादन आणि शिल्लक धरून देशातील साखरेचा एकूण साठा ३४३ टन होणार आहे. देशांतर्गत साखरेची मागणी २८३ लाख टन असून, ७ लाख टन साखरेची निर्यात होणार आहे. त्यामुळे चालू हंगाम संपताना सप्टेंबरअखेरीस साखरेचा अतिरिक्त साठा ५३ लाख टन असेल,’ असे ‘इस्मा’ने म्हटले आहे.
तुऱ्यांमुळे ऊस उत्पादनात घट
‘चालू हंगामात महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये उसाचे उत्पादन कमी झाले असून, साखरेचा उतारा वाढला आहे. उसाचे उत्पादन कमी होण्यामागे उसाला मोठ्या प्रमाणात फुटलेले तुरे कारणीभूत ठरले आहेत. जास्त पाऊस झाल्याने ऊस परिपक्व होण्याचा कालावधी कमी होऊन उत्पादकतेत घट झाली. याचबरोबर कारखान्यांकडून गाळप जास्त झाल्यानेही ऊसतोडणी लवकर झाल्याचाही परिणाम उसाच्या उत्पादकतेवर झाला,’ असे ‘इस्मा’ने नमूद केले आहे.
उसाच्या क्षेत्रात वाढ
‘इस्मा’ने दिलेल्या माहितीनुसार, देशातील उसाच्या क्षेत्रात वाढ होत आहे. विशेष करून महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये उसाच्या लागवडीत वाढ झाली आहे. यामुळे पुढील हंगामात साखर उत्पादन चांगले राहील. पुढील हंगामात ५३ लाख टन अतिरिक्त साठा उपलब्ध असल्याने देशांतर्गत साखरेची टंचाई जाणविणार नाही.
देशातील साखर उत्पादन (हंगाम २०२५-२६)
एकूण उत्पादन : ३२४ लाख टन
इथेनॉलसाठी वर्गीकरण : ३१ लाख टन
निव्वळ उत्पादन : २९३ लाख टन
राज्यनिहाय एकूण साखर उत्पादन (लाख टनांमध्ये)
महाराष्ट्र : ११८
उत्तर प्रदेश : ९८.५
कर्नाटक : ६१.०४
गुजरात : ८.७६
तमिळनाडू : ८.२९
इतर राज्ये : २९.५

