मुंबई : राज्यातील यंदाचा साखर हंगाम आटोपला आहे. एक नोव्हेंबरपासून सुरू झालेले गाळप साधारण १५ एप्रिलपर्यंत चालले. हंगामात सरासरी ९० ते १०० दिवस गाळप चालले. हंगामअखेर १०४५.५८ लाख टन उसाचे गाळप होऊन, सरासरी ९.४९ टक्के ९९.१८ लाख टन साखर उत्पादन झाले आहे.

गाळप हंगामात १०३ सहकारी आणि १०७ खासगी, असे एकूण २१० कारखान्यांनी गाळप सुरू केले होते. दैनिक १०,०७,८०० टन क्षमतेने कारखान्यांनी एकूण १०४५.५८ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा ९.४९ टक्के राहिला. १६ एप्रिलअखेर एकूण ९९.१८ लाख टन साखर उत्पादन झाले आहे.

गाळप, साखर उतारा आणि साखर उत्पादनात कोल्हापूर साखर विभागाची आघाडी कायम आहे. विभागातील ३९ कारखान्यांनी ११ टक्के उताऱ्यासह २३.१९ लाख टन साखर उत्पादन केले. त्या खालोखाल पुणे विभागाने २२.२२ लाख टन, सोलापूर विभागाने १९.१० लाख टन, अहिल्यानगर विभागाने ११.१३ लाख टन, छत्रपती संभाजीनगरमध्ये १० लाख टन, नांदेड विभागात ११.९० लाख टन, अमरावती विभागात ११.४४ लाख टन, नागपूर विभागात ०.८१ लाख टन, असे एकूण ९९.१८ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वी इथेनॉल उत्पादनासाठी वळविण्यात आलेली साखर वगळून राज्यात निव्वळ साखर उत्पादन १०० लाख टन होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

‘एफआरपी’ वाढीचा आर्थिक भार

उसाच्या रास्त आणि किफायतशीर दराच्या (एफआरपी) कायद्यात एफआरपी आणि साखरेचे किमान विक्री मूल्य (एमएसपी) यांची सांगड घालण्यात आली आहे. एफआरपी बरोबर एमएसपी वाढ अनिवार्य करण्यात आली आहे. पण, केंद्र सरकारने २०१९ पासून साखरेचा किमान विक्री मूल्य प्रति किलो ३१ रुपये कायम ठेवले आहे. दुसरीकडे एफआरपीत सहा वेळा वाढ केल्यामुळे सरासरी एफआरपी प्रति टन ३५०० रुपयांवर गेली आहे. इथेनॉल खरेदीतही दुजाभाव केला जात आहे. मक्यासह धान्य आधारित इथेनॉल प्रकल्पातून उत्पादीत झालेल्या इथेनॉलला जास्त दर आणि सरकारकडून खरेदीही जास्त केली जात आहे. त्यामुळे साखरेपासून इथेनॉल निर्मितीला मर्यादा आल्या आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी दिली.

कारखान्यांना प्रति क्विंटल साखरेमागे ४०० ते ५०० रुपये तोटा

आखाती युद्धामुळे साखर निर्यात बंद झाली आहे. युद्धापूर्वी साखरेचे दर ३७ ते ३८ रुपये किलो होते, ते ३४ ते ३५ रुपयांवर आले आहेत. एक क्विंटल साखर उत्पादनासाठी ४,०६९ रुपये खर्च येतो, ती साखर ३,४०० ते ३,५०० रुपये प्रति क्विंटलने विकावी लागत आहे. कारखान्यांना ४०० ते ५०० रुपये तोटा होत आहे, या स्थितीत कारखाने एफआरपी कसे देणार. केंद्र सरकारने साखर धोरणाचा फेरविचार करण्याची गरज आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी दिली.

यंदाचा साखर हंगाम

गाळ केलेले एकूण कारखाने – २१०

एकूण ऊस गाळप – १०४५.५८ लाख टन

साखर उतारा – ९.४९ टक्के

एकूण साखर उत्पादन – ९९.१८ लाख टन