यंदाच्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर पार पडलेल्या संचलन सोहळ्यात सहभागी झालेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाने तिसरा क्रमांक पटकावला आहे. अरूणाचल प्रदेशच्या चित्ररथाने पहिले स्थान मिळवले असून त्रिपुराच्या चित्ररथाला दुसरा क्रमांक मिळाला आहे. प्रजासत्ताकदिनी राजपथावर झालेल्या संचलनात महाराष्ट्रासह १७ राज्यांचे व केंद्रीय मंत्रालयांचे सहा असे एकंदर २३ चित्ररथ सहभागी झाले होते.

राजपथावर झालेल्या संचलनात यंदा  महाराष्ट्राकडून लोकमान्यांच्या जीवनकार्याचा वेध घेणारा चित्ररथ सादर करण्यात आला होता. प्रसिद्ध कलादिग्दर्शक चंद्रशेखर मोरे यांनी या चित्ररथाची संकल्पना मांडली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ४० कलाकारांनी हा देखणा चित्ररथ उभारला होता. लोकमान्य टिळकांच्या १६०व्या जयंतीनिमित्त या चित्ररथाच्या माध्यमातून त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला आणि स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या योगदानाला उजाळा देण्यात आला होता. ‘मराठा’ व ‘केसरी’ या वृत्तपत्रांच्या माध्यमांतून लोकमान्यांनी केलेली जनजागृती, ब्रिटिश राजवटीविरोधात केलेला संघर्ष, सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती यांसारखे उत्सव सुरू करून स्वातंत्र्यचळवळीसाठी केलेली जनजागृती, टिळकांवर ब्रिटिश सरकारतर्फे चालवण्यात आलेले खटले आदी बाबी चित्ररथाच्या माध्यमातून दाखविण्यात आल्या होत्या.

चित्ररथ वैशिष्टय़े..

  • चित्ररथाच्या प्रारंभी लोकमान्यांचा अग्रलेख लिहितानाचा १५ फुटी भव्य पुतळा होता. त्याच्यामागे एक छापखाना दाखविण्यात आली होती. १९१९ मध्ये टिळकांनी लंडनहून डबल फिल्टर छपाई मशिन मागवून त्याद्वारे ‘केसरी’ व ‘मराठा’ वृत्तपत्राची छपाई सुरू केली होती. हे दृश्य साकारण्यात आले होते.
  • चित्ररथाच्या मध्यभागी फिरते मंदिर होते. त्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि गणेशोत्सवाची स्थापना करतानाचा देखावा होता.
  • चित्ररथाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला बंगालच्या फाळणीनंतर टिळकांवर चालविण्यात आलेला मुंबई उच्च न्यायालयातील खटला आणि मंडाले येथील तुरुंगवासही दाखविण्यात आला होता.