मुंबई : उद्योग जगताच्या गरजा ओळखून नवनवीन कौशल्यविषयक अभ्यासक्रम राज्याच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये लागू करण्याची योजना असून त्याकरिता टाटा समुहाकडून भरीव असे तीन हजार कोटींचा निधी दिला जाणार आहे. त्यातून प्रत्येक जिल्ह्यातील दोन आयटीआयना दत्तक घेतले जाणार आहे, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री मंगळप्रभात लोढा यांनी विधान परिषदेत दिली.
१०० हून अधिक वर्षांचा वारसा असलेल्या इंडियन एज्युकेशन सोसायटीला मुंबईत खासगी कौशल्य विद्यापीठ सुरू करण्यास मान्यता देणारे विधेयक गुरूवारी मंजूर करण्यात आले. त्यावेळी चर्चेदरम्यान कौशल्याधारित शिक्षणात होणाऱ्या बदलांचा लोढा यांनी आढावा घेतला.
जागतिक बँक आणि आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने आयटीआयमध्ये अद्ययावत यंत्रसामुग्री आणली जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना विद्युत वाहने, सौर ऊर्जा पॅनेल आणि ड्रोन तंत्रज्ञानाचे प्रगत शिक्षण दिले जाईल. त्यासाठी चार हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या शिवाय प्रत्येक जिल्ह्यातील दोन आयटीआय टाटा समुहाकडून दत्तक घेतली जाणार आहेत. त्यासाठीचा प्रस्ताव येत्या मंत्रिमंडळ बैठकीत येईल. याकरिता टाटांनी तीन हजार कोटींचा निधी देऊ केला आहे, अशी माहिती लोढा यांनी दिली.
दोन वर्षांनी अभ्यासक्रम बदलणार
विधेयकावरील चर्चेदरम्यान खासगी कौशल्य विद्यापीठांकडून विद्यार्थ्यांची लूट होऊ नये, तसेच आरक्षणाचे नियम लागू असावे, अशी अपेक्षा सदस्यांनी व्यक्त केली. त्यावर अनुसूचित जाती-जमातींचे आरक्षण या संस्थांना लागू राहील, अशी ग्वाही लोढा यांनी दिली. विद्यापीठांवर अंकुश असावा याकरिता त्यांच्या व्यवस्थापन समितीवर दोन सरकारी प्रतिनिधी कार्यरत असतील. तसेच, काळानुरूप नवीन अभ्यासक्रम या कौशल्य विद्यापीठांमध्ये लागू केले जाणार आहे. त्याकरिता गरज भासल्यास दर दोन वर्षांनी अभ्यासक्रम बदलले जातील, अशी माहिती लोढा यांनी दिली.
