राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या शिक्षकांसाठी ‘प्रवेश पात्रता परीक्षे’चे (महाटीईटी) १० ऑक्टोबर रोजी होणार आहे. दोन वर्षांनी ही परीक्षा होते आहे. शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (टीईटी-टीचर इलिजिबिलिटी टेस्ट) २०२१  नोंदणी उद्यापासून म्हणजेच ३ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. याआधी २०१८-१९मध्ये ही परीक्षा झाली होती. दरवर्षी साधारणपणे सात ते आठ लाख शिक्षक टीईटी देतात. दोन वर्षांनी परीक्षा होत असल्याने यावेळी सुमारे १० लाख शिक्षक परीक्षा देतील असा अंदाज आहे. राज्यभरात २० ते २५ हजार प्राथमिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. या पदांवरील भरतीकरिता टीईटी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

नव्या शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये (टीईटी) काही बदल करण्यात आले आहेत. नव्या धोरणात पूर्वप्राथमिक ते बारावीपर्यंतच्या शिक्षकांचे टीईटी उत्तीर्ण असणे अनिवार्य करण्यात आल्याने टीईटीमधील बदलांसाठी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने (एनसीटीई) समिती नियुक्त केली होती.

इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यमे, अनुदानित तसेच विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षण सेवक, शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांनी या परीक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. परीक्षेशी संबंधित सर्व माहिती परिषदेच्या mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

टीईटी परीक्षेसाठी असणार दोन पेपर

टीईटी परीक्षेसाठी दोन पेपर घेण्यात येणार आहेत. १ ली ते ५ वी या वर्गांसाठीच्या शिक्षकांना एक पेपर द्यावा लागतो. तर सहावी ते आठवीची परीक्षा देण्यासाठी दुसरा पेपर द्यावा लागतो. टीईटीचा पेपर क्रमांक १ देण्यासाठी दोन वर्षांचा शिक्षणशास्त्र विषयाती डिप्लोमा म्हणजेच डीएड उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे. त्याशिवाय दुसऱ्या पेपरसाठी डी.एड उत्तीर्ण असणारे उमेदवार, पदवी उत्तीर्ण, शिक्षणशास्त्र विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण असणारे उमेदवार पात्र असणार आहेत.

असे असेल महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक

शिक्षक पात्रता परीक्षा पेपर १ आणि २ सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात होणार आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी ३ ऑगस्ट २०२१ ते २५ ऑगस्ट २०२१ पर्यंत रात्री २३.५९ वाजेपर्यंत असणार आहे. २५ सप्टेंबर २०२१ ते १० ऑक्टोबर २०२१ पर्यंत प्रवेशपत्राची ऑनलाइन प्रिंट घेता येणार आहे. शिक्षक पात्रता परीक्षेचा पहिला पेपर हा १० ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १ या वेळात होईल. तर दुसरा पेपर हा त्याच दिवशी दुपारी २ ते सायंकाळी ४.३० या वेळामध्ये होणार आहे.