Today’s Maharashtra Top Political News: राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीचा निकाल १६ जानेवारी रोजी जाहीर झाला. या महापालिका निवडणुकीत मुंबईत भाजपा-शिंदे सेनेच्या युतीला मोठं यश मिळालं, तर ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसला. आता मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून मोठ्या घडामोडी सुरू आहेत. यातच संजय राऊतांनी केलेल्या दाव्यामुळे चर्चांना उधाण आलं. मुंबईत भाजपाचा महापौर होऊ नये ही एकनाथ शिंदेंची इच्छा असल्याचं राऊतांनी म्हटलं. दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी केलेल्या वक्तव्याची मोठी चर्चा सुरू आहे. दरम्यान, यासह आज दिवसभरातील महत्वाची पाच राजकीय विधाने काय आहेत? जाणून घेऊयात.
“आघाडी कुठीलीही असो पण चिन्ह…”, मंत्री भरणेंचं मोठं वक्तव्य
जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी एक मोठं वक्तव्य केलं. त्यांच्या वक्तव्यानंतर जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकाच चिन्हावर निवडणूक लढणार का? याबाबत चर्चांना उधाण आलं. मंत्री भरणे म्हणाले की, “वैयक्तिक माझं मत असं आहे की मग कुठलीही आघाडी असो. फक्त आमच्या पक्षाचीच नाही तर कोणतीही आघाडी असली तरी चिन्ह हे एकच असलं पाहिजे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याबाबत आमच्या पक्षाचे अध्यक्ष अजित पवार हे योग्य तो निर्णय घेतील. पण निवडणुकीत ग्रामीण भागातील अनेक लोकांचा मतदान करताना चिन्हावरून गोंधळ होतो.”
“महापौर आकाशातून येईल का?”, नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंची उडवली खिल्ली
‘देवाच्या मनात आलं तर शिवसेनेचा महापौर होईल’, अशी आशा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. तसंच, पडद्याआड बऱ्याच चर्चा सुरू आहेत, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. या दोन्ही वक्तव्यांची नारायण राणे यांनी खिल्ली उडवली. आज सिंधुदुर्गात पत्रकार परिषद घेत नारायण राणे म्हणाले की, “उद्धव ठाकरे आता देवावर विसंबून राहायला लागले का? देवासमोर कधी हात जोडले नाहीत. मग आकाशातून महापौर येईल का? संख्या बघ जरा. एवढा फरक कसा काय भरून काढणार? त्यामुळे उद्धव ठाकरे सध्या नैराश्येत गेले आहेत. महाराष्ट्रात भाजपाची २५ महापालिकेत सत्ता आली, आता तरी शहाणे बना ना आणि घरी बसा”, असा खोचक सल्ला नारायण राणे यांनी दिला.
“उद्धव-राज ठाकरेंची फोनवरून चर्चा, पडद्यामागून हालचाली सुरू”, राऊतांचं विधान चर्चेत
मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेची ३० वर्षांची सत्ता उलथवून टाकण्यात भाजपाला यश आलं. अशातच ‘देवाच्या मनात आलं तर शिवसेनेचा महापौर बनेल’ असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं. त्यानंतर आज संजय राऊतांनी पडद्यामागून बऱ्याच हालचाली सुरू असल्याचं वक्तव्य केलं. राऊत म्हणाले की, “मुंबईचा महापौर ठाकरे बंधूंचा किंवा शिवसेनेचा व्हावा यापेक्षा भाजपाचा होऊ नये अशी एकनाथ शिंदेंसह त्यांच्या बरोबर असलेल्यांचीही इच्छा आहे. देवाची इच्छा असेल तर महापौर बसू शकतो. मी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भेट घेतली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचीही फोनवरून चर्चा झाली. आम्ही तटस्थपणे सगळ्या हालचालींकडे पाहात आहोत, पण पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहेत. आम्ही महापौरपदावर दावा केला आहे असं नाही. जे काही आकडे आहेत ते जवळजवळ सारखे आहेत”, असं संजय राऊत म्हणाले.
“मुंबईत भाजपाचा महापौर होऊ नये ही एकनाथ शिंदेसह…”; संजय राऊत यांचा मोठा दावा
मुंबईसह २९ महापालिकांचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. मुंबईत भाजपाला ८९ तर एकनाथ शिंदेंच्या पक्षाला २८ जागा मिळाल्या. महायुतीचा महापौर बसण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं. दरम्यान संजय राऊतांनी मोठा दावा केला. मुंबईत भाजपाचा महापौर होऊ नये ही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील शिवसैनिकांचीही इच्छा आहे असं त्यांनी म्हटलं. राऊत म्हणाले की, “निवडून आलेले जे नगरसेवक आहेत, ते मूळचे शिवसैनिक आहेत. जो शिवसैनिक असतो त्याच्या मनात शिवसेनेबाबत वेगळी भावना आहे. भाजपाचा महापौर होऊ नये हे त्यांच्या मनात आहे हे आम्हाला समजलं. कुणी कितीही कोंडून ठेवलं तरीही इतकी साधनं असतात संपर्काची, दळणवळणाची त्यानुसार संदेश येत असतात. मुंबईचा महापौर ठाकरे बंधूंचा किंवा शिवसेनेचा व्हावा यापेक्षा भाजपाचा होऊ नये अशी एकनाथ शिंदेंसह असलेल्यांचीही इच्छा आहे. देवाची इच्छा असेल तर महापौर बसू शकतो”, असं संजय राऊत यांनी म्हटलं.
“परिणाम तर भोगावे लागतील”, पराभवानंतर वसंत मोरेंची पोस्ट चर्चेत
पुण्याच्या राजकारणात नेहमी कोणत्या न कोणत्या कारणांनी चर्चेत असणारे आणि शिवसेना ठाकरे गटाचे दिग्गज नेते वसंत मोरे यांना पुणे महापालिकेच्या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. भाजपाचे उमेदवार व्यंकोजी खोपडे यांनी वसंत मोरे यांचा पराभव केला आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर वसंत मोरे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली. वसंत मोरे यांनी म्हटलं की, “चार वर्ष पुणे शहरात कोणतेही पद नसताना २०२२ ते २०२६ गरीब मायबाप जनतेचा आधार बनून होतो आणि आता तर २० हजार ८६७ पीडित, शोषित, प्रमानिक जनतेने आशीर्वाद दिला आहे, परिणाम तर भोगावे लागतील ना…”, असं वसंत मोरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
