Maharashtra Top 5 Political News: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार याच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष असतील, अशी घोषणा अखेर आज झाली. अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर विलीनीकरण, राष्ट्रीय अध्यक्ष हे विषय चर्चेत आले होते. तसेच दुसऱ्या बाजूला आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या अपघातामागे घातपात असल्याचा संशय व्यक्त करत त्यांची लढाई कायम ठेवली आहे. आज बारामती येथे त्यांनी डीजीसीए विरोधात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतला नाही. महाराष्ट्रात आज या विषयांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही विधानसभेत भाषण झाले. राज्यातील आज चर्चेत राहिलेल्या पाच राजकीय घडामोडी जाणून घेऊ.

पोलिसांना तसे निर्देश दिले असावेत – असीम सरोदे

अजित पवार यांचा अपघात नसून घातपात आहे, असा संशय रोहित पवार यांना आहे. यासाठी ते गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करत आहेत. दखलपात्र गुन्हा असण्याची शक्यता असेल तर पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेणे गरजेचे आहे. हा अपघात घडवून आणला असेल तर त्यापर्यंत विषय जाऊ शकतो. त्यामुळे गुन्हा नोंदवून घ्यायचा नाही, असे पोलिसांनाही सांगण्यात आलेले असेल, असा संशय वकील असीम सरोदे यांनी व्यक्त केला.

अजित पवार या वादळाबरोबर ४० वर्ष संसार – सुनेत्रा पवार

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी भावनिक भाषण केले. त्या म्हणाल्या, पक्षाची स्थापना झाल्यापासून मी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरितीने जोडली गेली होती. अजित पवार नावाच्या वादळाबरोबर मी ४० वर्ष संसार केला आहे. त्यामुळे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी अत्यंत कठीण असली तरी पक्षाच्या पाठबळामुळे ती अशक्य नाही. याचा मला विश्वास वाटतो. हा सन्मान केवळ माझा नसून तळागाळात काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे.

टिपू सुलतान चांगले होते की वाईट.. – मुख्यमंत्री फडणवीस

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना केल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभरात उमटले होते. आज विधानसभेतही या विषयावर भाष्य करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांना प्रत्युत्तर देताना म्हणाले, टिपू सुलतान चांगले होते की वाईट होते यावर काही आक्षेपच नाही. आक्षेप यावर आहे की टिपू सुलतान छत्रपती शिवरायांच्याइतके मोठे राजे होते असे म्हणण्याला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “छत्रपती शिवरायांच्या इतकंच गुणगान टिपू सुलतानचं केले पाहिजे त्याला आक्षेप आहे. देशाच्या इतिहासाशी जी छेडछाड करण्यात आली त्यामध्ये वर्षानुवर्षे आम्हाला हे शिकवले की टिपू सुलतान महान राजे होते. पण हे कधीही सांगितले नाही की ७५ हजार हिंदू आणि ३३ हजार नायरांची कत्तल करणारेही तेच टिपू सुलतान होते. हे नाही शिकवले नाही, ते इंग्रजांशी लढले ते स्वतःचे राज्य वाचवण्यासाठी. आता खरा इतिहास जो सापडतो आहे.”

…तर अजित पवारांच्या रुपाने सर्वोत्तम मुख्यमंत्री मिळाला असता – सुनील तटकरे

अजित पवारांच्या शोकप्रस्तावावर बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, “महाराष्ट्राला न लाभलेला उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणजे अजित पवार.” मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचा हवाला देताना सुनील तटकरे यांनी २००४ चा प्रसंग पुन्हा सांगितला. आज पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत बोलत असताना ते म्हणाले, अजित पवारांच्या नेतृत्वाखाली २००४ साली राष्ट्रवादीचे सर्वाधिक ७३ आमदार निवडून आले होते. तेव्हाच जर अजित पवारांना मुख्यंमत्री केले असते तर राज्याला अजित पवारांच्या रुपाने सर्वोत्तम मुख्यमंत्री मिळाला असता.

अजित पवारांच्या अपघातामागे मोठ्या व्यक्तीचा हात – रोहित पवार

अजित पवारांच्या अपघातामागे घातपाताचा संशय व्यक्त करत रोहित पवार यांनी डीजीसीएविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. “अजित पवारांचे दुर्घटनाग्रस्त लेयरजेट हे विमान सदोष होते, हे आता डीजीसीएकडून सांगितले जात आहे. मग हे विमान अजित पवारांना चुकून दिले की, जाणूनबुजून दिले गेले? हा आमच्या समोरचा प्रश्न आहे. यात कोणत्यातरी मोठ्या व्यक्तीचा हात आहे, असा संशय आम्हाला आहे. याची चौकशी करण्यासाठी एफआयर दाखल होत नाही, याचा अर्थ कोणत्यातरी मोठ्या व्यक्तीचा वाचविले जात आहे”, असा खळबळजनक दावा रोहित पवार यांनी केला.