scorecardresearch

साखर उत्पादनात महाराष्ट्र अव्वल ; राज्यात साडेअकरा कोटी क्विंटल साखरेचे उत्पादन

देशात साखर उत्पादनात मागील दोन ते तीन वर्षे उत्तरप्रदेश अग्रस्थानी होते. तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी राहिला होता.

सांगली : यंदाच्या हंगामात महाराष्ट्राने साखर उत्पादनामध्ये देशात पहिला क्रमांक मिळवला असून ११ कोटी ५४ लाख १८ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले असल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी दिली.

या वाढत्या साखर उत्पादनामुळे महाराष्ट्राने चीन, थायलंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान या देशांपेक्षा साखर उत्पादनात आघाडी घेतली आहे. ब्राझीलबरोबर महाराष्ट्र ऊस व इथेनॉल उत्पादनाबाबत स्पर्धा करत आहे.

चालू वर्षी महाराष्ट्राने ऊस गाळप आणि साखर उत्पादनात देशात प्रथम क्रमांक मिळवला असून सन २०२१-२२ मध्ये आत्तापर्यंत महाराष्ट्रात ११ कोटी १२ लाख ३४ हजार मेट्रीक टन ऊस गाळप तर ११ कोटी  ५४ लाख  १८ हजार क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. चालू वर्षी १०.३८ टक्के साखर उतारा मिळाल्याची महितीही त्यांनी यावेळी दिली.

देशात साखर उत्पादनात मागील दोन ते तीन वर्षे उत्तरप्रदेश अग्रस्थानी होते. तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी राहिला होता. हे चित्र यंदा बदलले असून महाराष्ट्राने ऊस गाळप आणि साखर उत्पादनात उत्तरप्रदेशला मागे टाकत देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. महाराष्ट्राने उत्तरप्रदेशच्या तुलनेत सुमारे ३५ लाख क्विंटलहून अधिक साखरेचे जादा उत्पादन  घेतले आहे. तर राज्यात गतवर्षीच्या तुलनेत १ कोटी ५७ लाख  ३२ हजार क्विंटल जादा साखरेचे उत्पादन घेतले असल्याचे त्यांनी सांगितले. उस उत्पादकांना ‘एफआरपी’नुसार देयके देण्यासाठी साखर आयुक्तालय प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra tops in sugar production zws

ताज्या बातम्या