scorecardresearch

करोना रुग्ण संपर्कातील लोक शोधण्यात महाराष्ट्र सपशेल नापास!

३१ जिल्ह्यात अवघ्या ४. ६ रुग्णांचा सरासरी शोध

(संग्रहित छायाचित्र)
संदीप आचार्य
मुंबई : महाराष्ट्रात करोनाला आटोक्यात आणण्यासाठी अनेक आदेश काढले गेले मात्र गेल्या सहा महिन्यात यातील एकाही आदेशाची काटेकोरपणे अमलबजावणी करण्यात आलेली नाही. राज्यात एका करोना रुग्णामागे संपर्कातील किमान २० लोकांना शोधण्याचे आदेश असताना प्रत्यक्षात ३१ जिल्ह्यात सरासरी ४.६  लोकांनाच शोधण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.राज्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील ३१ जिल्ह्यात आरोग्य विभागाने करोना रुग्ण संपर्कातील किती व्यक्ती शोधल्या याचा आढावा घेतला तेव्हा ३१ जिल्ह्यात करोना रुग्णाच्या संपर्कातील सरासरी १० लोकांना शोधण्यात आल्याचे दिसून आले होते.

त्यानंतर आरोग्य विभागाने २१ सप्टेंबर रोजी पुन्हा राज्यातील सर्व जिल्ह्यात रुग्ण संपर्कातील किती लोकांना शोधण्यात आले याची पाहाणी केली. या पाहाणीत गंभीर रुग्णांच्या ( हाय रिस्क) संपर्कातील सरासरी अवघे ४.६ लोकांचाच शोध घेतल्याचे तर सौम्य लक्षणे असलेल्या ७.२ लोकांचा शोध घेण्यात आल्याचे दिसून आले आहे. याचाच अर्थ सरकारने रुग्ण संपर्कातील जास्तीत जास्त लोकांचा म्हणजे एका रुग्णामागे किमान २० लोक शोधण्यास सांगितले होते. मुंबईसह राज्यात वेळोवेळी आरोग्य विभागाने याबाबत आदेश जारी करूनही बीड जिल्हा वगळता राज्यातील एकाही जिल्ह्यात रुग्ण संपर्कातील लोकांना शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न यंत्रणेने केला नाही.

राज्यात करोना रुग्ण वेगाने वाढण्यात जी काही कारणे आहेत त्यातील रुग्ण संपर्कातील लोकांचा योग्य शोध न घेणे हे एक प्रमुख कारण असल्याचे आरोग्य विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्यातील सातारा, सोलापूर, औरंगाबाद, चंद्रपूर, यवतमाळ आदी जिल्ह्यात एका करोना रुग्णामागे ४ ते ७.८ एवढेच संपर्कातील लोकांना शोधण्यात आल्याचे आकडेवारीनुसार दिसून येते.

यातील गंभीर बाब म्हणजे ठाणे, पुणे, कोल्हापूर, नागपूर या करोना रुग्णांची मोठी संख्या असलेल्या व रोजच्या रोज करोना रुग्ण वाढत असलेल्या जिल्ह्यातील परिस्थिती भीषण म्हणावी अशी आहे. ठाण्यामध्ये एका करोना रुग्णामागे अवघे ३.७ रुग्ण शोधण्यात आले तर ज्या कोल्हापूरवासीयांनी मास्क घालणे, सॅनिटाइजरचा वापर वा डिस्टसिंगचे पालन धुडकावून लावले त्या कोल्हापूरात अवघे ३.३ संपर्कातील लोक शोधले गेले. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण ज्या पुण्यात आढळून आले तेथे तरी यंत्रणेने एका गंभीर करोना रुग्णाच्या संपर्कातील २० लोकांना शोधणे अपेक्षित असताना सध्या पुणे तिथे सारेच उणे ही अवस्था असून हाय रिस्क असलेले केवळ २.६ लोक शोधण्याचे दिसून येते.

पुण्यात वा ठाण्यात तसेच कोल्हापूर मध्ये लोक मास्क लावायला तयार नाहीत की अन्य कोणते निर्बंध पाळताना दिसतात, अशा परिस्थितीत एकटा आरोग्य विभाग काय करणार असा अस्वस्थ प्रश्न आरोग्य विभागाचे डॉक्टर विचारताना दिसतात. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात हाय रिस्कचे केवळ २.२ रुग्ण शोधण्यात आले आहेत. महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यांमध्ये एका करोना रुग्णामागे सरासरी ४.६ संपर्कातील लोक शोधण्याचे काम होणार असेल तर करोनाला रोखणार कसे हा कळीचा प्रश्न आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी करोना रुग्णाच्या संपर्कातील लोकांना शोधण्याचे काम केले की टाळले हा खरा प्रश्न आहे. या जिल्ह्यात एका करोना रुग्णामागे अवघे १.९ एवढेच संपर्कातील हाय रिस्क लोकांना शोधण्यात आले आहे. गेल्या सहा महिन्यात करोनाला रोखण्यासाठी सरकारने अनेक आदेश काढले यातील बहुतेकांचे लोकांनीही पालन केले नाही आणि अधिकार्यांनीही त्याची काटेकोर अंमलबजावणी केली नाही. त्यामुळेच महाराष्ट्रात आज देशात ‘करोना नंबर १’ बनले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra totally fails to find corona patient contacts scj 81

ताज्या बातम्या