मुंबई : राज्यातील काही महत्वाच्या पर्यटन स्थळांची पर्यटन विभाग मोठ्या शहरात प्रसिध्दी करीत असताना राज्यातील आर्कषक पर्यटनस्थळांचा प्रसार करण्यासाठी पर्यटन विभागाने काटेकोरपणे प्रसिद्धीचे नियोजन करावे. आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्यातील पर्यटनस्थळांची प्रसिध्दी प्रभावीपणे राबविण्यात यावी, असे आदेश पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. एप्रिल महिन्यात डोंगरी पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्याच्या सूचना देसाई यांनी दिल्या.

सह्याद्री शासकीय अतिथीगृह येथे पर्यटन विभागाच्या विविध विषयाच्या अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली होती. पर्यटन विभागातंर्गत विविध महोत्सवांचे आयोजन राज्यात करण्यात येते. आगामी कालावधीत डोंगरी महोत्सवाचे एप्रिल महिन्यात नियोजन करावे. या महोत्सवात स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडविणारे कार्यक्रम, नामांकित कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम, कृषी पर्यटन, आई पर्यटन धोरणावर केंद्रित स्थानिक महिला सशक्तीकरण कार्यक्रमांचे आयोजन, गड-किल्ले दर्शन, विविध साहसी उपक्रम, पॅराग्लायडींग, पॅरामोटरिंग, रॉक क्लायबींग, सीप्लॅन राईड हे उपक्रम आयोजित करण्यात यावेत. स्थानिक ठिकाणी पर्यटनाला चालना देण्यासाठी हे उपक्रम असतील असे देसाई यांनी सांगितले.

राज्यातील ७५ पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पर्यटकांसाठी आधुनिक मुलभूत सोयी-सुविधायुक्त नमो पर्यटन केंद्र व माहिती सुविधा केंद्र स्थापन करण्याबाबत मान्यता देण्यात आली. पहिल्या टप्प्यातील प्रतापगड, शिवनेरी, साल्हेर व रायगड येथील कामे गतीने करावीत. राज्यात नमो पर्यटन कौशल्य कार्यक्रमासाठी ७५०० प्रशिक्षणार्थ्यांपैकी प्रथम २५०० व उर्वरित ५००० प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्याबाबतच्या कामाला गती देण्यात यावी, असे निर्देशही देसाई यांनी दिले. यावेळी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे,पर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे उपस्थित होते.