मुंबई: नेपाळमधील काठमांडू व चीनमधील सागा (चीन) येथे पर्यटनासाठी गेलेल्या राज्यातील विविध जिल्ह्यातील नागरिकांना परत आणण्यासाठी तेथील सरकारच्या माध्यमातून कार्यवाही करण्यात येत आहे. याअंतर्गत नेपाळमध्ये अडकलेले १०६ नागरिक शुक्रवारी भारतात दाखल झाले तर उद्या शनिवारी आणखी ८४ नागरिक हे भारतात परतणार असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
रायगड, अहिल्यानगर, नागपूर यासह विविध जिल्ह्यांतील नागरिक सुरक्षितरीत्या परतत असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील ४५ पर्यटक नेपाळ येथील चितवन येथे आहेत. या समूहात अहिल्यानंगरमधील २७, नाशिकमधील १२, पुण्यातील ५, मुंबईतील एका पर्यटकाचा समावेश असल्याची माहिती संगमनेर येथील पर्यटन कंपनीचे सहल आयोजक दर्शन गुंजाळ यांनी दिली. हे पर्यटक उद्या शनिवारी भारतात अयोध्येत परतणार असल्याची माहिती त्यांनी दिली. हे सर्व नागरिक सुखरूप असून सद्यस्थितीत काठमांडूकडे जाणारे मार्ग बंद असल्यामुळे ते लुंबिनीकडे जाणार असून तेथून पुढे आयोध्याकडे जाण्याचे त्यांचे नियोजन आहे. सद्यस्थितीत त्यांना शासन स्तरावरून मदतीसाठी प्रयत्न केले जात आहे.
रायगड जिल्ह्यतील जय गिरनारी शिवदत्त मंदिर ट्रस्टच्या वतीने ३७ व्यक्ती नेपाळ येथे दर्शन व पर्यटनासाठी गेल्या आहेत. सध्या सर्व जण सागा (चीन ) येथे सुरक्षित आहेत. त्यांचे काठमांडू येथून २९ रोजी भारतात परतण्यासाठी विमान आहे. सर्व जण पर्यायी मार्गने काठमांडूकड़े आज सकाळी रवाना झाले असून सायंकाळपर्यंत काठमांडू विमानतळावर पोहोचतील. ते उद्या शनिवारी येतील, अशी माहिती पर्यटकांचे नातेवाईक दिलीप शेठ यांनी दिली आहे. सर्वांची प्रकृती ठीक असून त्यांच्यापैकी दोघे डॉक्टर असल्याची माहिती देण्यात आली आहे.
नागपूर जिल्ह्यातील सर्व १०६ नागरिक सुखरूप असून,नागपूर जिल्हा प्रशासन यांचा त्यांच्याशी सातत्याने संपर्क असून त्यांच्या सुरक्षित परतीच्या प्रवासाबाबत आवश्यक समन्वय व देखरेख करण्यात येत आहे. स्वत: मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे पर्यटक सुखरूप परतावेत यासाठी पुढाकार घेतला. त्यापैकी ४ नागरिक विमानाने दिल्ली येथे सुखरूप पोहोचले असून, उर्वरित १०२ नागरिक बसमार्गे भारतात दाखल झाले आहेत. हे नागरिक बिहार राज्यातील सीतामढी जिल्ह्यात असून, आज रात्री ते पटना येथे पोहोचून तेथे मुक्काम करणार आहेत. त्यानंतर उद्या २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७ वाजताच्या रेल्वेने पटना येथून नागपूरकडे रवाना होणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील पेठ येथील ११ नागरिक काठमांडू येथे असून त्यांना मदतीसाठी आवश्यक ते प्रयत्न केले जात आहेत. नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर्स जारी करण्यात आला आहे. मंत्रालयातील नियंत्रण कक्षात २४ तास हा कक्ष कार्यरत असून मदतीसाठी १०७० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलनासाठी ऑनलाइन फॉर्म महाराष्ट्रातील विविध भागातील पर्यटक आणि नागरिक नेपाळमध्ये अडकले असण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अडकलेल्या नागरिकांचा अचूक तपशील तात्काळ ऑनलाइन फॉर्मच्या माध्यमातून उपलब्ध करून घेण्याच्या सूचना राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत (एसडीएमए) अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्यासाठी एक https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf विशेष ऑनलाइन फॉर्म तयार करण्यात आला आहे. आपल्या जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अडकलेल्या नागरिकांची माहिती संबंधित लिंकवरून तात्काळ भरून डेटाबेसमध्ये अपलोड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
