दुकानांची वेळमर्यादा वाढविण्याची मागणी

पुणे/ठाणे : राज्यात पुन्हा सोमवारपासून दुकाने आणि अन्य सेवांच्या वेळेत बदल झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. निर्बंधांचा खेळ बंद करावा, अशी मागणी करीत पुणे, ठाणे, कोल्हापूरसह विदर्भातील व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

राज्यातील बहुतांश ठिकाणी स्तर तीनचे निर्बंध पुन्हा लागू झाल्याने अत्यावश्यक वगळता अन्य दुकानांची वेळ सकाळी ७ ते दुपारी ४ अशी झाली आहे. या वेळगोंधळाचा फटका व्यापारी, ग्राहक आणि उद्योगजगतालाही बसत आहे. वेळांमध्ये करण्यात आलेल्या बदलांवर व्यापारी वर्गातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दुपारी चापर्यंतची वेळ गैरसोयीची असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

निर्बंधांमुळे ठाणे, कल्याण-डोंबिवली शहरांतील व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. दोन आठवडय़ांपूर्वी या शहरांचा दुसऱ्या स्तरामध्ये समावेश करण्यात आला होता. त्यामुळे येथील दुकानांच्या वेळा नियमित झाल्या होत्या. काही व्यापाऱ्यांनी व्यापार सुरळीत होत असल्याचा अंदाज बांधत घाऊक बाजारातून लाखोंच्या वस्तू खरेदी केल्या होत्या. मात्र, सोमवारपासून लागू करण्यात आलेल्या नव्या निर्बंधांमुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजी आहे. निर्बंधांमुळे

व्यापारी आणि राज्य सरकार दोघांचे नुकसान आहे. सरकारने यावर ठोस निर्णय घेऊन व्यापाऱ्यांना वेळमर्यादा वाढवून द्यावी, अशी मागणी ठाणे व्यापारोद्योग महासंघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आशिष शिरसाट यांनी केली.

उद्घाटने आणि आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चे सुरू आहेत. मग केवळ आम्हा व्यापाऱ्यांवरच बंधने का, असा सवाल पुणे व्यापारी महासंघाचे आणि पुणे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी केला.

नव्या निर्बंधांवरून कोल्हापूरमध्ये सोमवारी व्यापारी आणि प्रशासन यांच्यात संघर्ष उडाला. अखेर प्रशासनाने विनंती केल्यावर दोन दिवसांसाठी व्यवसाय बंद ठेवण्याचे व्यावसायिकांनी मान्य केले. मात्र, या काळात निर्बंधांचा फेरविचार न केल्यास १ जुलैपासून दुकाने सुरू करण्याचा इशारा त्यांनी दिला.

राज्य सरकार ऊठसूट निर्बंध लागू करून आमच्या भविष्याशी खेळत आहे, असा सूर विदर्भातील व्यापाऱ्यांमध्ये उमटला. नागपुरात गेल्या महिन्यापासून करोना आटोक्यात आहे. मात्र, पुन्हा निर्बंध लागू करून आमचा व्यवसाय धोक्यात आणला जात आहे. आधीच व्यवसाय होत नाही. त्यात आणखी निर्बंध घातल्याने व्यापाऱ्यांची अवस्था वाईट झाली आहे. सरकारने आमच्या दुकानाचे निम्मे भाडे, बँकेचे हप्ते आणि वीज देयकही निम्मे माफ करावे, अशी मागणी विदर्भातील व्यापाऱ्यांच्या शिखर संघटनेचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी केली.

सरकारकडून कोंडी; भाजपची टीका

मुंबई : तिसऱ्या लाटेची भीती दाखवून राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून व्यापारी, व्यावसायिक, शेतकरी आदी सर्वच घटकांची कोंडी सुरू असल्याची टीका भाजपने केली आहे. करोना निर्बंधांमुळे सामान्य माणसापुढे जगण्याचा प्रश्न उभा राहिला असून, समाजात मोठा असंतोष पसरत आहे. हा असंतोष प्रकट होण्याच्या भीतीनेच सरकारने तिसऱ्या लाटेच्या नावाखाली सामाजिक आणीबाणी लागू के ल्याची टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते के शव उपाध्ये यांनी केली.