अलिबाग : देशाला स्वातंत्र मिळून ७१ वर्षे पूर्ण होऊनही दुर्गम भागातील नागरीक आजही रस्ते वीज, आणि पाणी यासारख्या सारख्या सोयीसुविधां पासून वंचित आहेत. स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतर त्यांच्या जिवनात आजही अंधारच आहे.
महाड तालुक्यात रायगड किल्ल्याच्या खोऱ्यात वसलेल्या अनेक आदिवासी आण धनगर वाड्या आजही विकासापासून वंचित आहे. रस्ते, वीज, पाणी यासारख्या मुलभूत सुविधाही या वाड्यामध्ये पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे चरितार्थ चालवण्यासाठी या वाड्यावस्त्यावरील नागरीकांना टोकाचा संघर्ष करावा लागतो आहे. सोलनपाडा कोंड येथील ढेबेवाडी ही देखील यापैकीच एक. बारा ते तेरा कुटूंबांची वस्ती असलेली ही छोटीशी वाडी आहे.
जी दुर्गमभागात वसलेली असून शेती, गुरे तसेच शेळ्या मेंढ्या पाळणे हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. वाडीवर आजही रस्ता, वीज आणि पाण्याची सुविधा नाही. त्यामुळे पावसाळ्यात डबक्यातील पाणी प्यायचे आणि उन्हाळ्यात झऱ्यातील पाण्यांचा शोध घेत वणवण फिरण्याची वेळ वाडीवरील लोकांवर येते.
प्राथमिक शाळेसाठी मुलांना दररोज चार ते पाच किलोमिटरची पायपीट करावी लागते. वाडीवर अजूनही वीज नसल्याने रात्रीचा अभ्यास रॉकेलच्या दिव्यांवर करावा लागतो. वाड्यांवर गॅस सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे सरपण जाळून धुरातच महिलांना स्वयंपाक करावा लागतो. वाडीवर जाण्यासाठी पक्का रस्ता उपलब्ध नाही. त्यामुळे कुठलेही वाहन येथे पोहोचू शकत नाही. कोणी आजारी पडले तर झोळी करून डोंगर उतरावा लागतो.
स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही अत्यंत हालाखीच्या परिस्थिती येथील ग्रामस्थ वास्तव्य करत आहे. सोलनपाडा कोंड गावातील ढेबेवाडी हे एक प्रातिनिधीक उदाहरण आहे, वारंगी खोऱ्यातील गाढवखडक वाडी, नेराव येथील सातकोंडा वाडी, सावर्डा येथील खलईवाडी, कोथुर्डे आदिवासी वाडी, करसई येथील िलगाडा, आणि टकमक वाडी या वाड्यामध्येही थोडी बहोत अशीच परिस्थिती आहे.
रस्ते, वीज, पाणी, वाहतुकीच्या संसाधनांपासून या वाड्या आजही वंचीत आहेत. त्यामुळे शिक्षण आणि आरोग्यासारख्या सुविधांसाठी तर या वाड्यांवरील लोकांना तारेवरची कसरत करावी लागते आहे.
जागतीक पातळीवर देश महासत्ता बनण्याच्या मार्गावर असल्याच्या चर्चा झडत आहेत. शाश्वत विकासची चित्र रंगवली जात आहेत. शहरीकरण वाढीस लागले आहे. दरडोई उत्पन्नातही वाढ झाली आहे.
पण हे सर्व होत असतांना ग्रामिण आणि शहरी भागातील दरीत वाढ होत आहे. मोबाईल, लॅपटॉप आणि सोशल मिडीयाच्या जमान्यात आजही दुर्गमभागातील लोकांना मुलभूत सोयी सुवीधांसाठी टोकाचा संघर्ष करावा लागतो आहे. स्वातंत्र्याच्या संत्तरीनंतरही अनेकांच्या जिवनात अंधार आहे. विकास कोणाचा आणि भकास कोण याचे कोड काही सुटत नाही.
‘ मुलांची शिक्षण घेण्याची इच्छा प्रबळ आहे. मात्र त्यासाठी त्यांना करावे लागणारे कष्ट बघवले जात नाही. दररोज डोंगर आणि ओढा ओलांडून धोकादायक परिस्थितीत ही मूल शाळेत येतात आणि पुन्हा परत जातात.’
– सुरज सावंत, शिक्षक सोलनपाडा कोंड
‘दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी वाड्या आणि धनगर वाड्यावर आजही मुलभूत सोयी सुविधा पोहोचलेल्या नाहीत. दुर्दैवाने या सोयीसूविधा येते पोहोचाव्या यासाठी फारसे प्रयत्नही झालेले नाहीत. प्रशासकीय पातळीवरही या आदिवासी आणि धनगर वाड्यांबाबत उदासिनता आहे. याकडे आता गांभिर्याने लक्ष्य देण्याची गरज आहे.’
– संजय कचरे, जिल्हा परिषद सदस्य