महाराष्ट्र समान नागरी संहिता समितीवर सेवानिवृत्त आयएएस अधिकारी शत्रुघ्न सिंग यांची २१ सप्टेंबर रोजी सदस्य-सह-वरिष्ठ सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती आर. सी. चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत ही नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायमूर्ती चव्हाण यांनी आपल्या राजीनाम्याच्या ईमेलमध्ये ज्या सदस्य नसलेल्या व्यक्तीच्या उपस्थितीवर आक्षेप घेतला होता, ते सिंग हेच आहेत. सात सदस्यांच्या समितीचा भाग नसलेल्या व्यक्तीच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते, असे वृत्त ‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिले आहे.
सिंग यांचा या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार
याबाबत माहिती घेण्यासाठी ‘द इंडियन एक्सप्रेस’ने सिंग यांना संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला. तसेच, न्यायमूर्ती देसाई यांनी देखील फोन कॉल्सला प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, न्यायमूर्ती चव्हाण यांनी याबाबत बोलताना, बैठकीच्या दिवशी किंवा त्यापूर्वी पाठवलेल्या ईमेलमध्ये सिंग यांच्या सल्लागार म्हणून नियुक्तीबद्दल कोणतीही पूर्वकल्पना दिली गेली नव्हती, असे ‘द इंडियन एक्सप्रेस’ला सांगितले.
१९ सप्टेंबरची बैठक
१९ सप्टेंबरच्या बैठकीत सल्लागार म्हणून सहभागी होण्यासाठी सिंग यांना समितीच्या अध्यक्षा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांनी आमंत्रित केले होते. सप्टेंबर महिन्यात समितीच्या दोन बैठका पार पडल्या, त्यापैकी सिंग केवळ दुसऱ्या बैठकीला उपस्थित होते. तिथे त्यांची सदस्यांशी ओळख करून देण्यात आली आणि ते त्यांची मतं मांडणार असल्याचे सांगण्यात आले, असे सूत्रांच्या हवाल्याने ‘द इंडियन एक्सप्रेस’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे. न्यायमूर्ती चव्हाण यांनी राजीनामा सादर करण्याच्या काही तास आधी ही बैठक पार पडली होती.
न्यायमूर्ती चव्हाण यांची सूचना
प्रस्तावित UCC वर लोकांचे मत जाणून घेण्यासाठी समिती ज्या प्रश्नावलीद्वारे काम करणार आहे, त्या प्रश्नावलीमध्ये अधिक व्यक्तिनिष्ठ स्वरूपाच्या प्रश्नांचा समावेश करावा असे न्यायमूर्ती चव्हाण यांनी सुचवले होते. पण, वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ प्रश्नांचे मिश्रण असलेली प्रश्नावली घेऊन पुढे जाण्याचा निर्णय समितीने घेतला, असे सूत्रांनी सांगितले. बैठकीत महाराष्ट्रातील जनतेला UCC समजावून सांगणाऱ्या मजकुरात करावयाचे बदल आणि वेबसाईटवर प्रश्नावली कशी समाविष्ट केली जाईल, या मुद्द्यांवर सिंग यांनी वेबसाईटमध्ये करावयाच्या बदलांविषयी चिंता व्यक्त केली, असेही सूत्रांनी एक्सप्रेसला सांगितले.
सिंग यांची नियुक्ती
बैठकीनंतर, चव्हाण यांनी समितीचा राजीनामा दिला. यानंतर २१ सप्टेंबर रोजी, महाराष्ट्र सरकारने अधिकृत पत्रव्यवहाराद्वारे सिंग यांची UCC समितीवर सदस्य-सह-वरिष्ठ सल्लागार म्हणून नियुक्ती केली. यापूर्वी सिंग यांनी उत्तराखंडच्या UCC वर न्यायमूर्ती देसाई यांच्याबरोबर काम केले आहे. न्यायमूर्ती देसाई यांच्या नेतृत्वाखालील उत्तराखंड UCC समितीच्या पाच सदस्यांपैकी ते एक होते आणि कायदा मसुदा तयार करणाऱ्या उप-समितीचा भाग होते. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे डिसेंबरमधील हिवाळी अधिवेशनात सरकार UCC विधेयक मांडण्याचा विचार करत आहे.
