मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी १ लाख ८० हजार ५७४ शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. गतवर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने राज्यात शेतीचे सुमारे १ लाख १४ हजार ७५२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. त्यामुळे १ लाख ८० हजार ५७४ शेतकऱ्यांच्या शेती आणि शेतीमालाचे नुकसान झाले होते. या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना १२८.८६ कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे.
प्रामुख्याने चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नाशिक, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील नुकसानग्रस्तांना ही मदत झाली आहे.
दरम्यान, जानेवारी ते मार्च २०२६ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे २,३३,८९० शेतकऱ्यांच्या एकूण १,४५,६०६ हेक्टरखालील शेती पिकांचे नुकसान झाले होते. केळी, कांदा, पपई, आंबा, द्राक्षे, गहू, हरभरा, ज्वारी इत्यादी पिकांचे नुकसान झाले आहे. लातूर, सोलापूर, नाशिक, सातारा, धुळे, नंदूरबार, यवतमाळ, अहिल्यानगर, पुणे, जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, आणि बीड जिल्ह्यांमध्ये जास्त नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे पाच लोकांचा मृत्यू आणि नऊ लोक जखमी झाले असून, ३६ जनावरांचाही मृत्यू झाला आहे.
गत आठवड्यात १.९४ हेक्टरवरील पिके बाधित
चालू महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसानेही १,९४,३२९ शेतकऱ्यांच्या १,२२,९९३ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यंदाच्या वर्षांत अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.
