मुंबई : राज्यातील बहुतांश भागाला गत चार दिवसांपासून वादळी वारा, पाऊस आणि गारपिटीचा फटका बसत आहे. सोसाट्याचा वारा, पाऊस आणि गारपिटीमुळे १ लाख २२ हजार ९९३ हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज असल्यामुळे नुकसानीत वाढ होण्याचा अंदाज आहे.
राज्यात गत चार दिवसांपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहेत. या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका नाशिक जिल्ह्याला बसला असून, ३०,४४८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्या खालोखाल अहिल्यानगरमध्ये २३,६३३ हेक्टर, जळगावात २२,३६१ हेक्टर, धुळ्यात १४,८३२ हेक्टर, बुलढाण्यात ८,५०७ हेक्टर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये ८,४४५ हेक्टरचे नुकसान झाले आहे. मुंबई शहर आणि मुंबई उपनगरसह अन्य काही जिल्ह्यांचा अपवाद वगळता राज्यातील सर्वच जिल्ह्यांत पिकांचे नुकसान झाले आहे.
फळपिकांना मोठा फटका
रब्बी हंगामातील काढणीला आलेले गहू, मका, हरभरा, ज्वारी, कांद्यासह केळी, आंबा, डाळिंब, संत्रा, द्राक्ष या फळपिकांचे. टरबूज, कलिंगड, काकडी, पपईसह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अनेक ठिकाणी शेतशिवारात काढलेला कांदा कुजला आहे. पपईची लहान रोपे खराब झाली आहेत. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शेतातील उभी पिके आडवी झाली आहेत. काढणीला आलेला गहू, ज्वारी सततच्या पावसामुळे काळा पडला आहे.
नुकसानीचे तातडीने पंचनाम्याचे आदेश
पिकांच्या नुकसानीचा सतत आढावा घेतला जात आहे. फळपिकांचे नुकसान मोठे आहे. नाशिक परिसरात शेतशिवारात काढून ठेवलेला कांदा पावसात भिजला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत दिली जाईल. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
