मुंबई : विदर्भापासून दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत वाऱ्याची द्रोणीय स्थिती (ट्रफ) निर्माण झाल्यामुळे पुढील चार दिवस विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांत मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह उन्हाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भापासून दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत वाऱ्याची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. द्रोणीय स्थितीमुळे एकाच वेळी अरबी समुद्रावरून आणि बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे राज्याच्या दिशेने येत आहेत. त्यामुळे ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहून, मेघगर्जनेसह उन्हाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
दरम्यान, कृषी विभागाने १७ ते २० मार्च दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये दुपारनंतर मेघगर्जनेसह पाऊस, वादळी वारे आणि गारपीठ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपिटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
अमरावतीत देशात सर्वाधिक तापमान; विदर्भातील तापमान कमी होणार ?
देशातील सर्वाधिक ४१.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद विदर्भातील अमरावती येथे झाली. अकोल्यात ४१.५, वर्ध्यात ४०.६, सोलापूर ४०.१ आणि मालेगावमध्ये ४०.० अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. विदर्भातील अमरावती, अकोला आणि वर्धा जिल्ह्यांत उष्णतेची लाट होती. गत दोन – तीन दिवसांपासून गुजरात आणि महाराष्ट्रावर वाऱ्याची प्रतिचक्रीय स्थिती निर्माण झाल्यामुळे उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागला. शनिवारपासून तापमानात काहिशी घट होऊन दिलासा मिळेल, अशी माहिती हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी दिली.
