मुंबई : राज्यातील मतदार याद्यांच्या सखोल विशेष फेरतपासणी (एसआयआर) मोहिमेचा दुसरा टप्पा आषाढी वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राबवू नये, अन्यथा लाखो वारकऱ्यांची नावे मतदार यादीतून वगळली जाण्याची शक्यता असल्याची भीती आहे. त्यासाठी मतदारयादी फेरतपासणी कार्यक्रम महिनाभर पुढे ढकलण्यात यावा अशी मागणी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम पत्राद्वारे केली आहे.

निवडणूक आयोगाने १४ मे रोजी राज्यात मतदार यादी विशेष सखोल फेरतपासणी मोहिमेची घोषणा केली होती. त्यानुसार मॅपिंगचे काम सध्या सुमारे ७२ टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले असून, दुसरा टप्पा ३० जून ते २९ जुलैदरम्यान राबविण्यात येणार आहे. या टप्प्यात मतदार नोंदणी अधिकारी (बीएलओ) घरोघरी जाऊन गणना प्रपत्र वाटप करून मतदारांकडून माहिती भरून घेणार आहेत.

मात्र याच कालावधीत आषाढी वारी असल्याने पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील २० हून अधिक जिल्ह्यांतील लाखो वारकरी पायी दिंड्यांमधून पंढरपूरकडे रवाना होतात. त्यामुळे अनेक कुटुंबे घराबाहेर असतील आणि बीएलओंना प्रत्यक्ष संपर्क होऊ शकणार नाही. परिणामी अनेक पात्र मतदारांची नावे यादीतून वगळली जाण्याची शक्यता असल्याचे सपकाळ यांनी पत्रात नमूद केले आहे.

हवामान खात्याने जुलै महिन्यात मुंबई महानगर परिसर, कोकण, पुणे आणि सातारा भागात अतिवृष्टीचा इशारा दिल्याने जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनालाही अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे लोकशाही प्रक्रियेत कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी एसआयआर कार्यक्रम किमान महिनाभर पुढे ढकलावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

मेलोडी चॉकलेट वाटत पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन

भाजप सरकारने केलेल्या इंधन आणि गॅस दरवाढीच्या विरोधात काँग्रेसने बुधवारी दादर येथील इंडिया बुल्स समोर आंदोलन केले. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी रास्ता रोको करून लोकांना मेलोडी चॅाकलेट वाटप केले. यावेळी नरेंद्र मोदी सरकार आणि फडणवीस सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

पेट्रोल नाही, डिझेल नाही, सीलिंडर गायब आहे. इंधनाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. शेतमालाला भाव नाही, जनता हवालदिल आहे. भाजप सत्तेत आल्यापासून देशातील जनतेवर वरंवटा फिरवला जात आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धादांत खोटे बोलत आहेत, अशी टीका सपकाळ यांनी यावेळी केली.