Maharashtra Vidhan Parishad Election 2026: आगामी विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाकडून पहिल्यांदा पाच नावांची अधिकीकृत घोषणा करण्यात आली आहे. यासह एका विधानपरिषदेच्या एका पोटनिवडणुकीसाठी देखील उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाच्या अधिकृत यादीनुसार, भाजपाने पक्ष संघटनेत सक्रिय असलेल्या आणि विशेष प्रादेशिक वजन असलेल्या नेत्यांना संधी दिल्याचे दिसून येते.

भाजपाची यादी जाहीर

भाजपाने जाहीर केलेल्या यादीत सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार या नावांचा समावेश आहे. पक्षाने यावेळी प्रस्थापित नेत्यांऐवजी संघटनात्मक बांधणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कार्यकर्त्यांना बळ दिले आहे. भाजापने काँग्रेसच्या विधानपरिषद आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केलेल्या प्रज्ञा सातव यांना त्याच पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. प्रज्ञा सातव यांच्या रूपाने भाजपने महाविकास आघाडीला धक्का देण्याची तयारी केल्याचे दिसते, तर विवेक कोल्हे यांच्या माध्यमातून नगरमधील स्थानिक सत्तासमीकरणे साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

राष्ट्रवादीत इच्छुकांची भाऊगर्दी

दुसरीकडे विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या नऊ जागांपैकी एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची असून, त्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या पुणे जिल्ह्यातील पुणे शहर किंवा पिंपरी-चिंचवड शहरातील एकाची निवड करून बालेकिल्ला मजबूत करणार की, नेत्यांचे पुत्र किंवा निकटवर्तीयांना संधी देऊन घराणेशाही जपणार, याबाबत उत्सुकता असणार आहे.

शिंदेसेनेची उमेदवारी कोणाला?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत उमेदवारांविषयी अद्यापही निर्णय होऊ शकलेला नाही. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांना शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित झाल्याचे सांगण्यात येत होते. त्यासाठी पक्षाचे शिवसेनेते विलीनीकरण करावे, अशी अट ठेवण्यात आल्याचे समजते. पण, त्यावरून प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येच मतांतरे दिसून आली आहेत. शिंदे यांनी विधानपरिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोऱ्हे आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांची नावे निश्चित केल्याचे वृत्त होते. मात्र, या दोन्ही नावांना शिवसेनेच्या अंतर्गत वर्तुळातून विरोध होत असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय उद्धव ठाकरे यांच्या नावाची देखील महाविकास आघाडीकडून चर्चा सुरु आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० एप्रिल आहे. दोन मे रोजी उमेदवारी अर्जांची छाननी आणि तीन मे रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. १२ मे रोजी मतदान होऊन निवड होणार आहे.