मुंबई : विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर रिंगणातील सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले. या उमेदवारांना निवडून आल्याचे प्रमाणपत्रही विधिमंडळ सचिवांकडून देण्यात आले.
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी एकूण प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारांसह चार जणांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले होते. मात्र, या अपक्ष उमेदवारांचे अर्ज २ मे रोजीच्या छाननीत बाद झाले. त्यामुळे ९ जागांसाठी ९ उमेदवार रिंगणात राहिले. त्यामुळे आज अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर ९ उमेदवारांना निवडून आल्याचे घोषित करण्यात आले.
त्याचप्रमाणे विधान परिषदेच्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या प्रज्ञा सातव यांचा एकमेव अर्ज होता. त्यामुळे सातव यांनाही विजयी घोषित करण्यात आले. दरम्यान, विधान परिषदेवर निवडून आल्यानंतर अंबादास दानवे यांनी आज ‘मातोश्री’ वर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी खासदार अनिल देसाई, आमदार मिलिंद नार्वेकर आदी उपस्थित होते.
विजयी उमेदवार
भाजप : सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार
शिवसेना शिंदे गट : डॉ. नीलम गोऱ्हे, बच्चू कडू
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट : झिशान सिद्दिकी
शिवसेना ठाकरे गट : अंबादास दानवे
