शिवसेना नेते एकनाथ शिंदे संपर्काबाहेर असल्याने राज्यात राजकीय भूकंप आला आहे. विधानपरिषद निवडणुकीत भाजपाने महाविकास आघाडीला धक्का दिला असताना एकनाथ शिंदे अचानक बेपत्ता झाले असल्याने चर्चांना उधाण आलं आहे. निवडणुकीत भाजपाचे पाचही उमेदवारी विजयी झाले असताना शिवसेना आणि काँग्रेसची मतं फुटली आहेत. त्यातच एकनाथ शिंदेशी संपर्क होत नसल्याने त्यांनी बंड पुकारल्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान एकनाथ शिंदे सूरतमध्ये असून त्यांच्यासोबत जवळपास २५ आमदार उपस्थित असल्याची चर्चा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकनाथ शिंदेंसोबत कोण आमदार आहेत?

  • संजय राठोड एकनाथ शिंदेंसोबत असल्याची माहिती आहे.
  • अपक्ष आमदार जयस्वाल (रामटेक)
  • तानाजी सावंत (उस्मानाबाद)
  • ज्ञानराज चौघुले (उस्मानाबाद)
  • यवतमाळचे पालकमंत्री भुमरे
  • शांताराम मोरे (भिवंडी ग्रामीण)
  • विश्वनाथ भोईर (कल्याण पश्चिम)
  • बालाजी किणीकर (अंबरनाथ)
  • भरत गोगावले (महाड)
  • महेंद्र दळवी (अलिबाग)
  • महेंद्र थोरवे (कर्जत)
  • कृषिमंत्री दादा भुसे, नांदगावचे आमदार सुहास कांदे यांचेही फोन बंद आहेत.
  • सांगोल्याचे ॲड. शहाजीबापू पाटील पूर्वीपासून भाजपाच्या संपर्कात होते. ते आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं आहे.
  • खानापूर आटपाडीचे आमदार अनिल बाबर यांचाही सहभाग असल्याची माहिती. काही दिवसांपूर्वी शिवसेनेतील खदखद त्यांनी मांडली होती.
  • कोल्हापूरचे एकमेव आमदार प्रकाश आबिटकर एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत.
  • प्रताप सरनाईक यांच्याविषयी संभ्रम कायम आहे
  • ठाकरे सरकार कोसळलं आणि पुन्हा देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेवर आलं तर करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे हे भाजपाला पाठिंबा देऊ शकतात.

एकनाथ शिंदे हे सोमवारी सायंकाळी विधान परिषदेचा निकाल लागण्याच्या आधीपासूनच शिवसेना नेत्यांच्या संपर्कात नसल्याचं सांगितलं जातंय. एकनाथ शिंदेंसोबत १३ ते २५ आमदारही शिवसेनेच्या संपर्कात नसल्याची माहिती समोर येत आहेत. याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्व शिवसेना आमदारांची ‘मातोश्री’वर बैठक बोलावली आहे.

राष्ट्रवादीविरोधातील नाराजीकडे दुर्लक्ष करणं भोवलं?; एकनाथ शिंदेंसोबत रायगडचे तिन्ही शिवसेना आमदार संपर्क क्षेत्राबाहेर

मतं फुटली…

शिवसेनेचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या १३ आमदारांसहीत विधान परिषदेच्या निकालानंतरपासून संपर्कात नसल्याने शिवसेनेची धाकधूक वाढलीय. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपाला राज्यसभेपेक्षाही दहा मतं अधिक मिळाल्याचं उघड झालं असून महाविकास आघाडीतील मित्रपक्षांची अनेक मतं फुटल्याचं यावरुन स्पष्ट झालंय. विशेष म्हणजे कालच्या निवडणुकीदरम्यान सचिन आहिर वगळता कोणीही प्रसारमाध्यमांशी चर्चा केली नाही. आमश्या पाडवी आणि आहिर वगळता कोणताही नेता प्रसारमाध्यमांसमोर आला नाही. त्यातच आता एकनाथ शिंदे आणि आमदार पक्षाच्या संपर्कात नसल्याने शिवसेनेची चिंता वाढलीय.

शिंदे गुजरातमध्ये? हॉटेलची सुरक्षा वाढवली…

मातोश्रीवरील या बैठकीच्या आधी आणि नंतरही शिंदेंना संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र शिंदेशी संपर्क होऊ शकलेला नाही. त्यातच आता त्यांच्या फोनवर कॉल केल्यावर गुजराती भाषेमध्ये मोबाईल सेवेची ट्यून ऐकू येत असल्याने ते गुजरातमध्ये असल्याची चर्चा सुरु झाली असून काही वृत्तवाहिन्यांनी तसे वृत्तांकन केलं आहे. असं असलं तरीही शिंदे नेमके कुठे आहेत याची माहिती मिळालेली नाही. काल रात्रीपासूनच शिवसेनेचे आमदार वास्तव्यास असलेल्या ला मेरिडीअन हॉटेलची सुरक्षा वाढवण्यात आल्याचेही वृत्त आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan parishad list of mlas who might be with shivsena eknath shinde not reachable surat sgy
First published on: 21-06-2022 at 11:13 IST