मुंबई: राज्यात मतदार यांद्याच्या विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन गणना पत्रे भरून घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्यात असून सुमारे १८.४६ टक्के म्हणजेच एक कोटी, ८० लाख, ६० हजार मतदारांनी गणना प्रपत्रे जमा केलेली नाहीत. त्यामुळे हे मतदार मतदार यादीतून वगळले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या मतदारांची यादी जिल्हा स्तरावर जाहीर केली जाणार असून त्यांनी त्वरित गणना प्रपत्रे भरुन द्यावीत असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी बुधवारी केले.

राज्यातील एकूण ९ कोटी ७८ लाख ५४ हजार मतदारांपैकी ९९ टक्के म्हणजेच ९ कोटी ६९ लाख ९८ हजार मतदारांपर्यंत गणन प्रपत्र वाटप करण्यात आले आहे. यापैकी ७ कोटी ६० लाख ९८ हजार(७७.७७टक्के) मतदारांकडून स्वाक्षरीसह प्राप्त झालेल्या गणना प्रपत्रांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले असून १८.४६ टक्के मतदारांनी गणना प्रपत्र जमा केलेली नाहीत. तर ३६ लाख ९५ हजार मतदारांच्या गणना प्रपत्रावर कार्यवाही सुरु आहे. ज्या १८.४६ टक्के मतदारांचे गणना प्रपत्र जमा झालेले नाही त्यामध्ये प्रामुख्याने गैरहजर, स्थलांतरित, मृत आणि दुबार मतदारांचा सामावेश आहे. विशेषत: मुंबई, ठाणे, नागपूर, पालघर, रायगड या जिल्हयात गणना प्रपत्र जमा न करणाऱ्या मतदारांची संख्या अधिक असल्याची माहितीही चोकलिंगम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मुंबईत ३० टक्के मतदार अपात्र

मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन्ही जिल्ह्यांचा विचार करता आतापर्यंत ६३ टक्के गणना प्रपत्रांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. सुमारे ३० टक्के गणना प्रपत्र मतदारांनी दिलेली नसून ७ टक्के प्रकरणांची प्रक्रिया सुरू आहे. ठाण्यातही स्थलांतरित मतदार अधिक असल्याने मतदान नोंदणी अधिकारी( बीएलओ) यांना मतदारांर्यंत पोहचण्यात अडचणी येत आहेत. महानगर क्षेत्रांमध्ये स्थलांतरित लोकसंख्येमुळे अशा प्रकरणांचे प्रमाण तुलनेने अधिक असल्याचेही मुख्य निवडणूक अधिकारी यांनी सांगितले.

सध्याची प्रक्रिया १७ ऑगस्टपर्यंच चालणार असून ज्या मतदारांकडून गणना प्रपत्र मिळालेले नाहीत त्यांची यादी सबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असून राजकीय पक्षांनाही उपलब्ध करुन दिली जाणार आहे. राजकीय पक्षांच्या बूथस्तरीय प्रतिनिधींनी तसेच नागरिकांनी या याद्यांची पाहणी करावी. यादीत आपले किंवा परिचित पात्र मतदाराचे नाव चुकीने समाविष्ट झाले असल्यास त्याबाबत तातडीने संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देता येणार आहे. गणना पत्र भरून देण्यासाठी सध्या संबंधित नागरिक त्या ठिकाणी वास्तव्यास असणे महत्त्वाचे आहे. २००२ च्या मतदार यादीतील मॅपिंग किंवा जुळवणी झाली नसली अथवा आवश्यक कागदपत्रे सध्या उपलब्ध नसली तरी गणना पत्र भरून देण्यास नागरिकांनी टाळाटाळ करू नये. आवश्यक कागदपत्रे नंतर सादर करण्याची संधी उपलब्ध आहे.

गणना पत्रातील वैयक्तिक माहितीमध्ये नाव, मोबाईल क्रमांक, आई-वडिलांची नावे तसेच उपलब्ध असल्यास आधार क्रमांकाची माहिती भरावी आणि गणना पत्रावर स्वाक्षरी करावी. कुटुंबातील प्रौढ व्यक्तीलाही कुटुंबातील सदस्याच्या वतीने स्वाक्षरी करता येऊ शकते. तसेच या याद्या दररोज अद्ययावत केल्या जाणार असल्याने अंतिम मुदतीपूर्वी त्यांची नियमित पाहणी करण्याचे आवाहन चोक्कलिंगम यांनी केले. प्रारुप मतदार यादी २४ ऑगस्टला प्रसिद्ध होणार असून त्यानंतर महिनाभर प्रारुप यादीच्या अनुषंगाने दावे हरकती दाखल करण्यास संधी दिली जाणार आहे. २७ ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.

२४ऑगस्ट नंतर मतदारांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना क्रमांक ६, नाव वगळण्यासाठी नमुना क्रमांक ७ आणि पत्ता, मोबाईल क्रमांक, छायाचित्र आदी तपशीलांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी नमुना क्रमांक ८ भरता येणार आहे. तसेच १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांसह सध्याच्या मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांनाही या प्रक्रियेत अर्ज करता येणार आहेत.

दुबार नाव असल्यास एका ठिकाणची नोंद रद्द

एखाद्या मतदाराला एकापेक्षा अधिक ठिकाणी गणना पत्र प्राप्त झाले असल्यास एका ठिकाणची नोंद नाकारावी. एकापेक्षा अधिक ठिकाणी नाव असणे कायद्यानुसार कारवाईस पात्र ठरू शकते. निवडणूक यंत्रणेकडून छायाचित्रावर आधारित समान नोंदींची तपासणी केली जात असली तरी नागरिकांनीही आपले नाव दोन ठिकाणी नोंदलेले नाही याची खात्री करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.