मुंबई : राज्यात राबविण्यात आलेल्या मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) मोहिमेत ९०हून अधिक विधानसभा मतदारसंघांतील २५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांनी गणना प्रपत्र जमा केलेले नाही. त्यामुळे या मतदारसंघांतील मोठ्या संख्येने मतदारांची नावे ३१ ऑगस्टला प्रसिद्ध होणार्‍या प्रारूप मतदार यादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे. यामुळे आगामी काळात या मतदारसंघांतील राजकीय समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघांमध्ये प्रामुख्याने मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूरमधील मतदारसंघांचा समावेश आहे.

राज्यातील एकूण ९ कोटी ७८ लाख ५४ हजार मतदारांपैकी ७ कोटी ७१ लाख ५० हजार म्हणजे ७८.८५ टक्के मतदारांच्या स्वाक्षरीसह प्राप्त झालेल्या गणना प्रपत्रांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. मात्र, सुमारे २ कोटी ७ लाख म्हणजेच २१.१५ टक्के मतदारांनी गणना प्रपत्र जमा केलेले नाही. त्यामुळे या मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे.

गणना प्रपत्र जमा न केलेल्या मतदारांपैकी ७५ लाख ५२ हजार (७.७२ टक्के) मतदार त्यांच्या मतदारयादीतील पत्त्यावर आढळून आले नाहीत. तर ७६ लाख ८० हजार (७.८५ टक्के) मतदारांनी कायमस्वरूपी स्थलांतर केल्याचे आढळले आहे. मतदारयादीत ३४ लाख ८१ हजार (३.५६ टक्के) मृत मतदारांची नावे असल्याचेही फेरतपासणीत समोर आले आहे. अन्यत्र नोंदणी झालेल्या किंवा दुबार मतदारांची संख्या १७ लाख ६३ हजार आहे.

२५ ते ४७ टक्के मतदारांची प्रपत्रे नाहीत

एसआयआर मोहिमेत गणना प्रपत्र जमा न केलेल्या मतदारांचा विधानसभा मतदारसंघनिहाय तपशील निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार ९०हून अधिक मतदारसंघांत २५ ते ४७ टक्के मतदारांनी गणना प्रपत्र जमा केलेले नाही. त्यामुळे या मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे. खान्देशातील धुळे शहर, जळगाव शहर, नाशिक पूर्व, नाशिक मध्य आणि नाशिक पश्चिम या मतदारसंघांत तसेच विदर्भातील अकोला पश्चिम आणि नागपूरमधील हिंगणा, नागपूर नैऋत्य, नागपूर दक्षिण, नागपूर पूर्व, नागपूर मध्य, नागपूर पश्चिम, नागपूर उत्तर आणि कामठी या मतदारसंघांत ३५ ते ४० टक्के मतदारांनी गणना प्रपत्र जमा केलेले नाही. मराठवाड्यातील नांदेड उत्तर, जालना, औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम आणि औरंगाबाद पूर्व या मतदारसंघांत ३० ते ३२ टक्के मतदारांनी प्रपत्र जमा केलेले नसल्याने त्यांच्या नावांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.