मुंबई: राज्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पडताळणी ( एसआयआर) मोहिमेअंतर्गत मतदार यादीमधील नावासंदर्भात दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी निवडणूक आयोगाने १२ ऑक्टोबरपर्यंतची दिलेली मुदत अपुरी आहे. सध्या येत असलेल्या तांत्रिक अडचणी आणि मोठ्या प्रमाणावरील हरकतींची संख्या पाहता हा वेळ पुरेसा नाही. त्यामुळे १२ ऑक्टोबरची मुदत आणखी दोन महिन्यांनी वाढवून द्या, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मंगळवारी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.
निवडणूक आयोगाने मतदार यादीवरील दावे आणि हरकती नोंदवण्यासाठी फक्त १२ दिवसांचा कालावधी दिला आहे. आजही यादीतील १ कोटी ५४ लाख आणि ४० लाख तरुण मतदारांपैकी फक्त ३ लाख ९० हजार जणांनी नमुना अर्ज ६ मतदार नोंदणीसाठी दाखल केले आहेत. नमुना अर्ज ६ मधील चुका आयोगाच्या निदर्शनास आणून दिल्या. परंतु नवीन अर्जाची छपाई झालेली नाही. त्यामुळे नागरिकांना नवीन अर्ज उपलब्ध होत नाहीत, याकडे सपकाळ यांनी आयोगाचे लक्ष वेधले आहे.
बीएलओ घरोघर नोटीसा बजावत आहेत. मग नवीन अर्ज कोण स्वीकारणार, शाळांमध्ये सहामाही परीक्षा सुरू आहेत. अनेक बीएलओ शिक्षक असून त्यांच्या उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह आहेच. अतिरिक्त कामाचे त्यांच्यावर दडपण आहे. त्यामुळे कोट्यवधी नागरिकांना मतदार नोंदणीसाठी पुरेसा वेळ नाही. मतदार नोंदणीचे काम योग्य पध्दतीने होण्यासाठी दोन महिन्यांची मुदतवाढ आवश्यक आहे, असे सपकाळ यांनी पत्रात म्हटले आहे.
ज्ञानेशकुमारांविरोधातील प्रश्नांना भाजपचे मंत्री का उत्तर देतात? – नाना पटोले
ज्ञानेशकुमारांना विचारलेल्या प्रश्नांना भाजपचे मुख्यमंत्री व मंत्री उत्तर का देतात, असा सवाल काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला. निवडणुकीतील हा भ्रष्ट कारभार बाहेर आला तर भाजपाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही म्हणून भाजपाचे मुख्यमंत्री व अनेक मंत्री ज्ञानेशकुमार यांचा बचाव करीत आहेत. दोघे एकमेकांना पाठीशी घालत आहेत. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या व्यक्तीने संविधान व लोकशाही वाचवण्याचे काम केले पाहिजे पण ते मात्र निवडणूक आयोगातील भ्रष्ट कारभारावर पांघरूण घालत आहेत. ज्ञानेशकुमार हे मनमानी पद्धतीने काम करत आहेत हे देशासाठी घातक असल्याचे पटोले म्हणाले.
