नागपूर : राज्यातील काही भागात सध्या अंशतः आभाळी हवामान असून ही स्थिती या आठवड्यात कायम राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या दक्षिण भागांमध्ये दुपारनंतर स्थानिक स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो. हा पाऊस प्रामुख्याने कर्नाटक व तेलंगणा सीमेलगत असलेल्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील सीमावर्ती भागांमध्ये राहण्याची शक्यता आहे.

प्राथमिक अंदाज काय

दि. ३० व ३१ मार्च २०२६ दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये दिसून येऊ शकते. उर्वरित विदर्भात देखील हवामानात बदल दिसू शकतो. या दरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता नाकारता येत नाही.

शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या अद्ययावत अंदाजांकडे लक्ष ठेवावे व त्यानुसार शेतीची कामे नियोजित करावीत. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील त्यांच्या “एक्स” या समाजमाध्यमावरून खबरदारीचे आवाहन केले आहे.

हवामानात सातत्याने बदल

राज्यात मागील काही दिवसांपासून हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी उष्णता अशी स्थिती आहे. त्यामध्येच राज्यातील काही भागात कडाक्याची उष्णता आहे तर काही ठिकाणी पाऊस सुरू आहे. मराठवाड्यासह काही भागात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस कोसळताना दिसत आहे. पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाही. सततच्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून हाताशी आलेले पिक गेले.

सरकारकडून नुकसानीचे पंचनामे

सरकारकडून सध्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. रब्बीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने पुन्हा एकदा पावसाचा अत्यंत मोठा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पाऊस कायम राहणार आहे. मार्च महिना संपत आला आहे, तरीही पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाही. आजही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.