नागपूर : जुलैच्या सुरुवातीला दमदार हजेरी लावल्यानंतर काही दिवस विश्रांती घेतलेला मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रातील वातावरणात बदल होत असून कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबईसह कोकणातील सहा जिल्ह्यांना बुधवारी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

भारतीय हवामान खात्याचा अंदाज काय

भारतीय हवामान खात्याने बुधवारी पहाटे जारी केलेल्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यातील बहुतांश भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिली होती. विशेषतः मुंबई महानगर प्रदेशात तापमानात वाढ जाणवत होती. मात्र, आता कोकण विभागात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत मिळत आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात व्यापक स्वरूपाचा मुसळधार पाऊस २० जुलैनंतर पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.

कुठे आणि कसा पाऊस

पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत बुधवारी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. घाटमाथ्याच्या भागात काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पाऊस होऊ शकतो. पुणे जिल्ह्यातही दिवसभर हलक्या सरींची शक्यता असून १७ जुलैनंतर पावसाचा जोर वाढण्याचे संकेत आहेत. नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात पावसाची तीव्रता तुलनेने अधिक राहू शकते. तर अहिल्यानगर जिल्ह्यात हलक्या स्वरूपाच्या सरींची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांत १५ आणि १६ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. परभणी, बीड, लातूर, धाराशिव आणि हिंगोली जिल्ह्यांत हलका पाऊस पडू शकतो. नांदेड जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

विदर्भात अद्याप कोरडे वातावरण

विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत बुधवारी वातावरण प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी कोणताही हवामान इशारा जारी करण्यात आलेला नाही. मात्र, १६ जुलैनंतर या भागातही पावसाची सक्रियता वाढू शकते, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. दरम्यान, जून आणि जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाच्या तुटीचा सामना करणाऱ्या विदर्भ व मराठवाड्यासाठी पुढील आठवड्यातील मान्सूनची वाटचाल महत्त्वाची ठरणार आहे.