मुंबई : सध्या राज्यातील विविध भागांत सुरू असलेला उन्हाळी पाऊस आणि गारपिटीच्या घटना आणखी दोन दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यानंतर हवामान कोरडे होऊन पुन्हा तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
विदर्भापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यामुळे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातून बाष्पीयुक्त वारे राज्याच्या दिशेने येत होते. त्यामुळे राज्याच्या बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह उन्हाळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीच्या घटना घडल्या. आणखी दोन दिवस विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उन्हाळी पाऊस आणि तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यानंतर हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.
उन्हाळी पाऊस पावसामुळे राज्याला वाढत्या तापमानापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. विदर्भात चाळीस अंशावर गेलेले कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसवर आले आहे. मात्र पाऊस उघडताच आणि ढगाळ हवामान कमी होऊन आकाश निरभ्र होताच पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान
राज्यभरात उन्हाळी पाऊस सुरू असल्यामुळे काढणीला आलेल्या रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. तसेच अखेरच्या टप्प्यात असलेल्या द्राक्ष हंगामाला मोठा फटका बसत आहे. बेदाणा निर्मितीवर परिणाम होऊन, बेदाणा काळा पडण्याच्या घटना घडत आहेत. कोकण किनारपट्टी आणि मराठवाड्यातील आंबा पिकाचे नुकसान होत आहे. वादळी वाऱ्यामुळे आंबा गळून पडत आहे. गारपिट झाल्यामुळे आंबा, द्राक्ष, केळी, काकडी, कलिंगड, पपई सारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होताना दिसून येत आहे.
