मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून वादळी पावसाच्या प्रभावामुळे तुरळक ठिकाणी पावसाची नोंद होत असली तरीही या दरम्यान सर्वदूर पावसाचा अभाव असल्याचे पावसाच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. दरम्यान, वादळी पावसाचा प्रभाव हळूहळू ओसरत असून पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे असून राज्यातील अनेक भागात सध्या उकाड्यात वाढ झाली आहे. पुढील काही दिवसात कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
राज्यात ऑगस्ट महिन्यापासूनच पावसाने ओढ दिली आहे. या दरम्यान बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. या पावसाने काहीसा दिलासा दिला असला तरीही त्यामुळे पावसाची असणारी मोठी तूट भरून निघाली नाही. सध्या राज्यात १८ टक्के इतकी पावसाची तूट आहे. तसेच सप्टेंबर महिन्यातही पावसाने ओढ़ दिल्याने राज्यातील बहुतांश जिल्ह्यात ५० टक्क्यांहून अधिक पावसाची तूट आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान, शासनाने २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर केली आहे.
कमाल तापमानात वाढ होणार
पावसाने ओढ दिल्याने राज्यातील काही भागात उन्हाचा तडाखा अधिक जाणवत आहे. कोकण प्रदेशातील मुंबईसह बहुतांश जिल्ह्यात उकाड्यात वाढ झाली आहे. दरम्यान, रविवारी हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात ३३.२ अंश सेल्सिअस तर कुलाबा येथे ३२.१ अंश सेल्सिअस रत्नागिरी ३२.५, डहाणू ३४.७, सांगली ३३.५, सोलापूर ३६.६, जळगाव ३३.३, कोल्हापूर ३२.९ तसेच अमरावती येथे ३६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली जे सरासरी कमाल तापमानहून ४.५ अंश सेल्सिअसने अधिक होते. राज्याच्या कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला असून पुढील काही दिवसात उन्हाचा ताप आणखीन वाढण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे.
आज पावसाची शक्यता कुठे ?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार सोमवारी मध्य महाराष्ट्रातील पुणे घाट विभाग, सातारा घाट विभाग, कोल्हापूर घाट विभाग आणि कोल्हापूर, सांगली तसेच मराठवाड्यातील बीड आणि धाराशिव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना सोमवारी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला असून उर्वरित मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भाग आणि संपूर्ण कोकण प्रदेशात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
