बीडमधली एका महिलेची बातमी वाचून महाराष्ट्रात चाललंय काय असा प्रश्न आपल्याला पडेल. ही बातमी आहे एका महिलेची. ही महिला २० व्यांदा गरोदर आहे. पीटीआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. हातावर पोट असल्याने आणि पाच सहा मुलं सोडून स्वतःवर उपचार घेण्यास या महिलेने नकार दिला आहे. बीडमधील माजलगाव केसापुरी कॅम्प या ठिकाणी राहणाऱ्या लंकाबाई खरात या विसाव्यांदा गरोदर असल्याचं पीटीआयने म्हटलं आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना बीडच्या जिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल केलं होतं.

९ सप्टेंबर रोजी लंकाबाई खरात यांना बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केलं होतं. तपासण्या झाल्यानंतर डॉक्टरांनी लंकाबाईंना रुग्णालयात पुढचे दोन ते तीन महिने रहावे लागेल असे सांगितले. मात्र मुलांना आणि नवऱ्याला सोडून राहू शकत नाही असे या महिलेने सांगितले. त्यानंतर ही महिला घरी परतली. लंकाबाई खरात यांच्या नऊ मुली आणि दोन मुलं जिवंत आहेत. त्यांची पाच मुलं आणि तीन मुलींचा बाळंतपणादरम्यान मृत्यू झाला. लंकाबाई खरात या आत्तापर्यंत एकदाही रुग्णालयात बाळंतपणासाठी दाखल झालेल्या नाहीत.

 

लंकाबाई खरात यांची अद्याप आत्तापर्यंत एकदाही सोनोग्राफी झाली नव्हती.  गरोदर मातेचं कार्डही त्यांना मिळालेलं नाही. मागच्या वर्षी त्यांचा एक मुलगा दगावला. आता त्या पुन्हा गरोदर आहेत म्हणजेच १८ महिन्यात त्यांना दोनदा मुलं होतात. लंकाबाई खरात यांच्या चार मुली आणि एका मुलाचा विवाह झाला आहे. त्यांचीही ३, ४ आणि ५ अशी अपत्यं आहेत. त्यामुळे लंकाबाई वयाच्या ३८ व्या वर्षी आजीही झाल्या आहेत. त्यांना एकूण ११ नातवंडं आहेत. याआधीची बाळंतपणं घरीच झाली आहेत आता २० वं बाळंतपण रुग्णालयात होणार आहे.

“आम्हाला जेव्हा लंकाबाई खरात यांच्याबाबत माहिती मिळाली तेव्हा आम्ही त्यांन जिल्हा रुग्णालयात आणले. काही तपासण्याही केल्या. त्यांच्या पोटात असलेलं बाळ सुखरुप आहे. त्यांना काही औषधंही लिहून दिली आहेत तसंच त्यांना कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून स्वच्छता बाळगण्याचाही सल्ला दिला आहे” असं बीडचे सिव्हिल सर्जन डॉ. अशोक थोरात यांनी पीटीआयला सांगितलं.

हे उदाहरण फक्त लंकाबाई यांचंच नाही. तर माजलगावपासून १०० किमी अंतरावर असलेल्या लातूर जिल्ह्यातल्या अन्सर वाडा भागातही अशीच काहीशी स्थिती आहे. या गावात गावोगावी भीक्षा मागून आयुष्य जगणारा गोपाळ समाज राहतो. या गोपाळ समाजात अशा असंख्य महिला आहेत ज्यांना किमान १५ ते २० मुलं आहेत. एवढ्या मुलांची नावं काय ठेवणार? हा प्रश्न पडल्याने या मुलांना भाकरी, भाजी, गांजा, गोळी, बंदूक, सुपारी अशी नावं देण्यात आली आहेत.