अलिबाग- महिला व बाल विकास विभागात तब्बल २३ वर्षांनी मोठी भरती होणार आहे. राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत महत्वाची महिती दिली आहे. त्यामुळे शासकीय नोकरीसाठी प्रयत्नशील असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी असणार आहे. नियमित आणि बाह्य यंत्रणे मार्फत जवळपास १२ हजार पदे भरली जाणार असल्याची माहिती तटकरे यांनी दिली आहे. या निर्णयामुळे महिला सक्षमीकरणाला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
शासन निर्णयानुसार, विभागातील एकूण पदांचा आढावा घेण्यात आला. त्यापैकी काही पदे निरसित (रद्द) करून १६५ नव्या पदांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विभागासाठी एकूण ८ हजार ६६९ नियमित पदे मंजूर करण्यात आली आहेत. याशिवाय, विभागाच्या कामकाजासाठी २ हजार ८४३ पदे बाह्ययंत्रणेमार्फत भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. लवकरच या भरती प्रक्रीयेला सुरूवात होणार आहे. तब्बल २३ वर्षांनंतर महिला व बाल विकास विभागात ही भरती होणार आहे.
या शिवाय अंगणवाडी सेविका आणि एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजनेअंतर्गत १ लाख १० हजार ६६४ अंगणवाडी सेविका आणि १ लाख १० हजार ६६४ अंगणवाडी मदतनीस, अशी एकूण २ लाख २१ हजार ३२८ मानधनाधारित पदे देखील मंजूर करण्यात आली आहेत त्यामुळे राज्यातील ग्रामिण भागातील महिलांना मोठी रोजगार संधी उपलब्ध होणार आहे.
तब्बल २३ वर्षांनंतर घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय विभागाच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत उपयुक्त रणार आहे. यामुळे महिला व बालकल्याण योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल असा विश्वास महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे.
