मुंबई : महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी प्रस्तावित विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक परिमल सिंह यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय महिला वर्ष आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अकरा मार्च रोजी विधीमंडळात विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात राज्यातील महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी एक सर्वसमावेशक विधेयक तयार करण्याबाबत चर्चा झाली होती. त्या अनुषंगाने विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी परिमल सिंह यांची समिती स्थापन केली आहे.
समितीत यांचा समावेश
या समितीत कृषी आयुक्त सूरज मांढरे, यशदाचे महासंचालक शेखर गायकवाड, मुख्यमंत्र्याचे विशेष कार्य अधिकारी प्रिया खान, विधी व न्याय विभागाचे सेवा निवृत्त सह सचिव मंगला ठोंबरे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे प्रतिनिधी, महिला आर्थिक विकास महामंडळाचे प्रतिनिधी, एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन संस्थेचे प्रतिनिधी आणि विधी सेंटर फॉर लिगल पॉलिसी संस्थेचे प्रतिनिधींचा समावेश आहे. समितीला आपला अहवाल ७ एप्रिल २०२६ पर्यंत सादर करावयाचा आहे.
