मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे तीन दिवसांचा दुखवटा जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १२ जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत १२५ पंचायत समित्यांची निवडणूक दोन दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आल्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यंदा सुमारे ७ हजार उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी धाराशीव आणि लातूर या १२ जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान तर ७ फेब्रुवारीला मतमोजणी होणार होती. मंगळवारी उमेदवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर जिल्हा परिषदामधील निवडणुकीच्या लढतींचे चित्र स्पष्ट झाले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाले. त्यामुळे राज्य सरकारने तीन दिवस दुखवटा जाहीर केला आहे. या काळात निवडणूक प्रचार ठप्प झाला होता. त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी वाढीव कालावधी देण्यासाठी जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमातील उर्वरित मतदान, मतमोजणी या टप्प्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.

नवीन वेळापत्रकानुसार ५ ऐवजी आता ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. त्यामुळे जाहीर प्रचाराची समाप्ती ५ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता होईल. संबंधित ठिकाणी ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरु होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल. निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात ११ फेब्रुवारी पर्यंत प्रसिद्ध केली जातील.

जिल्हा परिषदेच्या ७३१ जागांसाठी २,६२४ उमेदवार रिंगणात

१२ जिल्हा परिषदेतील ७३१ जागांसाठी २६२४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून १२५ पंचायत समित्यांच्या १४६२ जागांसाठी ४ हजार ८१४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. धाराशीव जिल्हा परिषदेत सर्वाधिक २९४ उमेदवार उभे आहेत.