सोलापुरात प्रहार संघटनेने कर्नाटक प्रवासी बसला फासले काळे; बसचालकाचा मात्र सत्कार | Loksatta

सोलापुरात प्रहार संघटनेने कर्नाटक प्रवासी बसला फासले काळे; बसचालकाचा मात्र सत्कार

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे. बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करण्यात आल्याच्या घटनेने हा वाद वाढला आहे.

सोलापुरात प्रहार संघटनेने कर्नाटक प्रवासी बसला फासले काळे; बसचालकाचा मात्र सत्कार
सोलापुरात प्रहार संघटनेने कर्नाटक प्रवासी बसला फासले काळे

महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा पेटल्याचे दिसत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूरसह अक्कलकोट आणि जत भागातील गावांवर केलेल्या दाव्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील संबंध पुन्हा एकदा बिघडले आहेत. . बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करण्यात आल्याच्या घटनेने हा वाद आणखी चिघळला आहे. या घटनेचे पडसाद सोलापुरातही उमटले आहेत. आमदार बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी कर्नाटक परिवहन महामंडळाच्या प्रवासी बसला काळे फासून बोम्मई सरकार आणि कन्नड रक्षण वेदिके संघटनेचा निषेध नोंदविला. मात्र, याचवेळी संबंधित कर्नाटक एसटी बसचालकाचा पुष्पहार सत्कारही केला.

हेही वाचा- Maharashtra Karnataka Dispute : ‘कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता जरा तोंडास आवर घालावा आणि…’ राज ठाकरेंचा सूचक इशारा!

शहरातील सात रस्त्यावर दुपारी हा प्रकार घडला. प्रहार संघटनेचे स्थानिक नेते जमीर शेख व अजित कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. अचानकपणे झालेल्या या आंदोलनामुळे सात रस्त्यावरील वाहतूक काहीवेळ विस्कळीत झाली होती.

हेही वाचा- “तुमचा रस्ता कोल्हापुरातून जातो हे लक्षात ठेवा,” धनंजय महाडिकांचा कर्नाटकच्या नागरिकांना इशारा; म्हणाले “अशी गुंडगिरी…”

बेळगाव जिल्ह्यात हिरे बागेवाडीमध्ये टोलनाक्यावर कन्नड रक्षण वेदिके संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील मालमोटारींवर दगडफेक केल्यानंतर त्याचे महाराष्ट्रात पडसाद उमटले आहेत. प्रहार संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख जमीर शेख यांनी, कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसला काळे फासले. सार्वजनिक प्रवासी वाहनांतून सामान्यजन प्रवास करतात. अशा वाहनांची नासधूस करण्याची शिकवण प्रहार संघटनेची नाही. उलट, सार्वजनिक प्रवासी बसची प्रामाणिकपणे वाहतूक करणाऱ्या बसचालकांचे सदैव कौतुक वाटते. याच भूमिकेतून कर्नाटक एसटी बसवर काळे फासत असताना दुसरीकडे याच बसच्या चालकाचा पुष्पहार घालून सत्कार करीत असल्याचे शेख यांनी सांगितले. मात्र यापुढे कर्नाटकचे कोणी मंत्री वा अधिकारी सोलापुरात आल्यास त्यांची वाहने फोडून टाकू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 16:17 IST
Next Story
“बल्बचा शोध कधी लागला? मराठी माणसाला येड्यात…”, जितेंद्र आव्हाडांचं खोचक ट्वीट; ‘वेडात मराठे..’ चित्रपटावरून टोला!