राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे. तसेच, सचिन वाझेला देखील १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनाण्यात आल्याचं समोर आलं आहे.

या अगोदर न्यायालयीन कोठडी सुनावण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयाच्या विशेष सुट्टीकालीन एकलपीठाने रविवारी रद्द केला होता. तसेच देशमुख यांना १२ नोव्हेंबपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) कोठडी सुनावली गेली होती. त्यानंतर त्यांची कोठडीची मूदत संपल्यामुळे त्यांना १५ नोव्हेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश ईडीने दिले होते. आता पुन्हा एकदा त्यांना १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे.

हेही वाचा – अनिल देशमुख यांच्या अडचणी संपेना ; आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी!

दरम्यान, अनिल देशमुख यांनी न्यायालयाला घरच्या जेवणाला परवानगी देण्याची विनंती केली होती. मात्र त्यांची ही विनंती न्यायालयाने फेटाळून लावली. “तुम्ही आधी जेलचे जेवण खा. त्यानंतर विचार करू,” असे न्यायालयाने म्हटले.

मात्र, त्यांची प्रकृती पाहता न्यायालयाने त्यांचे बेडसाठीचे अपील मान्य केले.

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री श्री. देशमुख यांना २ नोव्हेंबर रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली होती. अंमलबजावणी संचालनालयाने मुंबईतील त्यांच्या कार्यालयात १२ तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली. मुंबईचे माजी पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी केलेल्या लाचखोरीच्या आरोपांमुळे देशमुख यांनी या वर्षाच्या सुरुवातीला आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.